शरद पवार यांनी कधीच अर्थमंत्रिपद सांभाळले नाही असे विधान अजित पवार यांनी केले होते. पण शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते आणि अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असतो असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सुळे म्हणाल्या की, शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे राज्याच्या आणि देशाच्या अनेक जबाबदाऱ्या होत्या. पवारांकडे जेव्हा कृषी खातं होतं तेव्हा त्यांनी हरित क्रांती करून दाखवली. त्याची नोंद काँग्रेसने तर घेतलीच पण विरोधात असलेल्या नरेंद्र मोदी सरकारनेही घेतली. त्यांच्या कामासाठी पद्मविभुषण देऊनही सन्मानित करण्यात आलं असे सुळे म्हणाल्या.
तसेच शरद पवार केंद्रीय गृहमंत्री होते. महाराष्ट्रात अनेक शाळा या पवार साहेबांच्या काळात सुरू झाल्या आहेत. अनेक एमआयडीसी या चव्हाण साहेबांच्या नंतर शरद पवारांच्या काळात सुरू झाल्या आहेत. रोजगार, शिक्षण, आरोग्यसेवा यातून महाराष्ट्राचा विकास झाला. महिला धोरण, मराठावाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे शरद पवार मुख्यमंत्री असताना दिलं गेलं. शरद पवार यांनी कधीच स्वतःहून अर्थमंत्रालयाचा कारभार पाहिला नाही. पण चार वेळा मुख्यमंत्री होऊनही ती जबाबदारी त्यांनी दुसऱ्याला दिली. शेवटी मंत्रिमंडळात शेवटचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतात असेही सुळे म्हणाल्या.