मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले असून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत मराठ्यांचा संयम सुटला तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे कठीण होईल, असा इशारा दिला आहे. जरांगे यांनी केज येथील घोंगडी बैठकीतून फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे.
जरांगे म्हणाले की, फडणवीस तुम्ही नीट राहा. मराठ्यांनी अजूनही संयम सोडलेला नाही. मराठ्यांचा संयम सुटला तर आमदार वगैरे सोडून द्या. तुम्हालाही मराठे महाराष्ट्रात राहू देणार नाही. मराठा काय करू शकतो हे फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे. जर आरक्षण दिले नाहीतर तुमची सत्ता घालवल्याशिवाय मराठे मागे हटणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस तुमचं नाव घेऊन बोलण्याची आमची इच्छा नाही. पण आमचा नाईलाज आहे. तुम्ही सत्तेवर बसला आहात म्हणून आम्हाला नाव घ्यावे लागत असले. नाहीतर तुमचे नाव शंभर पिढ्या तरी मराठे तोंडावर घेणार नाही, अशा शब्दांत जरांगे यांनी हल्लाबोल केला.
मराठा समाज आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही. त्यामुळे तुम्ही षडयंत्र रचण्याऐवजी मराठ्यांना आरक्षण देऊन टाका. फडणवीस दररोज ते नवीन नवीन आमदार माझ्या समाजाच्या विरोधात उभे करतात. मराठा समाज इतका वेडा नाही. देवेंद्र फडणवीस मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या अंगावर घालत आहेत. ते आपली शक्ती आपल्या विरोधात वापरण्याचे काम करत आहेत, असेही जरांगे म्हणाले.