कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड, कधी विजेच्या लाईनमध्ये अडथळे असे प्रकार सध्या ठाणे शहरात सुरू आहेत. शहरातील शिवाईनगर, शास्त्रीनगर, म्हाडा, वसंत विहार,लोकपुरम आणि वागळे इस्टेट इत्यादी भागांत
दररोज वीज खंडित होत असल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी, दुकानदार, छोटे कारखानदार वैतागले आहेत. दरम्यान ऐन गणेशोत्सवात ठाण्यात विजेचा खोळंबा सुरू झाल्याने ठाणेकर महावितरणच्या कारभाराविरोधात संतापले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ठाण्यात समस्यांचा सुकाळ पसरला आहे. वाहतूककोंडी, पाणी, परिवहन सेवा, समस्यांची कोंडी असताना त्यातच आता शहरी भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची नवी समस्या उद्भवल्याने नागरिकांचा जीव जेरीस आला आहे. उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या पोखरण रोड येथे वसंत विहार परिसरात अनेक छोटी मोठी दुकाने, दवाखाने, कोचिंग क्लासेस त्याचबरोबर रहिवासी इमारती आहेत. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे दुकानदार, विक्रेत्यांची गैरसोय होते. तसेच कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीदेखील अडचणी येतात त्यामुळे पालक आणि कोचिंग क्लासेसचालकांमध्येदेखील महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात उकाड्याचा फिल
घरात वीज गेल्यानंतर नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत. त्यातच अचानक वीज गेल्यानंतर विजेवरची उपकरणे खराब होण्याचादेखील मोठा धोका असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. घरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनादेखील वीज खंडीत झाल्यानंतर त्रास सहन करावा लागत असल्याने पावसाळ्यात उखाड्याचा फिल नागरिकांना येत आहे. महावितरणने तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.