के. एल. राहुलच्या 57 धावांच्या झुंजार खेळीनंतरही हिंदुस्थान ‘अ’ संघाला दुलीप ट्रॉफीच्या सामन्यात 76 धावांनी पराभव सहन करावा लागला. पहिल्या डावात 90 धावांची निर्णायक आघाडी घेतलेल्या हिंदुस्थान ‘ब’ संघाने दुसऱ्या डावात ऋषभ पंतच्या 61 धावांच्या फटकेबाज खेळीच्या जोरावर हिंदुस्थान ‘अ’ संघासमोर 275 धावांचे जबरदस्त आव्हान ठेवले. पण ‘ब’ संघाच्या गोलंदाजांनी ‘अ’ संघाच्या फलंदाजांना 198 धावांत गुंडाळून आपल्या विजयाची नोंद केली.
काल ऋषभ पंतच्या 47 चेंडूंतील 61 धावांच्या खणखणीत खेळीने हिंदुस्थान ‘ब’ संघाने तिसऱ्या दिवसअखेर 6 बाद 150 अशी मजल मारली होती. त्याने आपल्या या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार खेचले होते, पण पंत बाद होताच त्यांच्या धावांनाच ब्रेक लागला आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ संपताना नितीशकुमार रेड्डीनेही आपली विकेट गमावली.
शनिवारच्या दीडशतकी टप्प्यानंतर ‘ब’ संघाने आपला दुसरा डाव पुढे सुरू केला, पण त्यांना दोनशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही. नवदीप सैनी (13) आणि यश दयाळ (16) यांनी छोट्या-छोट्या खेळी करत संघाची धावसंख्या वाढवली. आकाश दीपने 56 धावांत ‘ब’ संघाचा अर्धा संघ टिपला. त्याला खलील अहमदची (69 धावांत 3) चांगली साथ लाभली. परिणामतः हिंदुस्थान ‘अ’ समोर 275 धावांचे उभे ठाकले.
हिंदुस्थान ‘अ’ला 75 षटकांमध्ये 275 धावांचे आव्हान पार करायचे होते, पण त्यांचा भरवशाचा मयांक अगरवाल बाद झाला. त्यानंतर शुबमन गिल आणि रियान पराग यांनी फटकेबाजी सुरू केली. रियानने 3 षटकारांचा वर्षाव करत 44 धावांची भागी रचली. तो बाद झाल्यावर कर्णधार शुबमन गिलसुद्धा 21 धावांवर बाद झाला. मग ध्रुव जुरेल आणि तनुष कोटियन भोपळासुद्धा फोडू शकले नाही आणि ‘अ’ संघाची 5 बाद 76 अशी केविलवाणी अवस्था झाली.
या स्थितीत ‘ब’ संघाने सामन्यावर आपली पकड घट्ट केली. पण त्यानंतर के. एल. राहुलने संघाची पडझड रोखण्याचा प्रयत्न केला. त्याने शिवम दुबे आणि कुलदीप यादवसह दोन उपयुक्त भागीदाऱ्या करत संघाला दीडशेसमीप नेले.
मात्र 121 चेंडूंत 57 धावांची धीरोदात्त खेळी केल्यानंतर राहुल बाद झाला आणि ‘ब’ संघाने आपला विजय जवळजवळ निश्चित केला. तळाला आकाशदीपने 4 षटकार आणि 3 चौकारांची आतषबाजी करत संघाला 198 पर्यंत नेले. तो धावबाद झाला आणि हिंदुस्थान ‘अ’ संघाच्या 76 धावांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. पहिल्या डावात 181 धावांची जिगरबाज खेळी करणारा मुशीर खान ‘सामनावीर’ ठरला.
हिंदुस्थान ‘क’ चा यशस्वी पाठलाग
हिंदुस्थान ‘ड’ संघाने दिलेले 233 धावांचे आव्हान ‘क’ संघाने 6 फलंदाजांच्या मोबदल्यात पार पाडले आणि दुलीप ट्रॉफी स्पर्धेत 4 विकेट राखून विजय मिळवला. हिंदुस्थान ‘ड’ चा डाव 164 धावांत गुंडाळल्यानंतर ‘क’ संघाचा डाव 4 धावांची नाममात्र आघाडी घेऊन बाद झाला. त्यानंतर ‘ड’ संघाचा डाव श्रेयस अय्यर (54), देवदत्त पडिक्कल (56) आणि रिकी भुई (44) यांच्या दमदार खेळानंतरही 236 धावांवर संपला. मानव सुतारने 49 धावांत 7 विकेट घेत ‘ड’ संघाचा डाव लवकर संपवला. ‘क’ संघाने ऋतुराज गायकवाड (46), आर्यन जुएल (47) आणि रजत पाटीदार (44) आणि अभिषेक पोरेल (नाबाद 35) यांच्या जोरावर विजयी लक्ष्य गाठले.