हिंदुस्थानच्या नवदीप सिंगने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या ‘एफ-41’ गटातील भालाफेक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. मात्र इराणच्या खेळाडूच्या आपत्तीजनक वर्तणुकीमुळे नवदीपच्या ‘चांदी’चं ‘सोन्या’त रूपांतर झाले अन् हिंदुस्थानच्या झोळीत सातवे सुवर्णपदक पडले.
तीन वर्षांपूर्वी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिलेल्या हिंदुस्थानच्या नवदीप सिंगने तिसऱ्या प्रयत्नांत 47.32 मीटर भालाफेक करीत नवीन पॅरालिम्पिक विक्रम प्रस्थापित केला, मात्र त्याचा हा पॅरालिम्पिक विक्रम औटघटकेचा ठरला. कारण इराणच्या बेत सहाय सादेघ याने पाचव्या प्रयत्नात 47.64 मीटर भालाफेक करीत आघाडी घेतली.
नवदीपला इराणी खेळाडूची ही कामगिरी ओलांडता न आल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, मात्र सुवर्णपदक विजेत्या बेत सहाय सादेघने सुवर्णपदकाचा जल्लोष हा पुनःपुन्हा आपत्तीजनकरीत्या झेंडा फडकवून केला. त्याच्या या अखिलाडूवृत्तीमुळे त्याची स्पर्धेतील कामगिरी अयोग्य ठरविण्यात आली.
या गैरवर्तणुकीमुळे त्याला हातचे सुवर्णपदक गमवावे लागले. त्यामुळे हिंदुस्थानच्या नवदीप सिंगला सुवर्णपदक मिळाले. चीनचा सन पेंगजियान (44.72 मीटर फेकी) रौप्यपदकाचा मानकरी ठरला, तर इराकच्या नुखाईलावी वाइल्डन याने 40.46 मीटर भालाफेक करीत कांस्यपदक जिंकले.
सिमरनला कांस्यपदक
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या हिंदुस्थानच्या सिमरन शर्मा हिने महिलांच्या 200 मीटर टी-12 शर्यतीत कांस्यपदकाची कमाई केली. विद्यमान जगज्जेती असलेल्या 24 वर्षीय सिमरनने 24.75 सेकंद वेळेसह कांस्यपदकावर मोहोर उमटविली.