राजकीय नेते जसे बोलतात तसे करीत नाहीत अशी नागरिकांची भावना आहे. त्यामुळे नेत्यांच्या विश्वासार्हतेत घट झाली आहे. लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे, पण विश्वसनीयता कमावणे आज कठीण झाले आहे, असे वक्तव्य करून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खळबळ उडवली आहे.
आपल्या स्पष्टवत्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या गडकरींनी शनिवारी नागपुरात राजकीय नेत्यांच्या विश्वासार्हतेबाबत बोलताना कुणाचे नाव घेतले नसले तरी केंद्र व राज्यात भाजपचीच सत्ता असल्यामुळे त्यांचा रोख भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडेच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नागपुरात एका कार्यक्रमात ते बोलत होते.
गडकरींना पुन्हा डावलले
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून नितीन गडकरी 100 दिवस प्रचार करणार असल्याचे नुकतेच सांगितले गेले होते. एरव्ही नेहमीच डावलले गेलेले गडकरी आता राज्यात सक्रिय होणार, अशी चर्चा यामुळे सुरू झाली असतानाच त्यांनी थेट नेत्यांच्या विश्वासार्हतेबद्दलच प्रश्चचिन्ह उपस्थित केले. यामुळे गडकरींचा पत्ता राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांनी पुन्हा कापला असावा, असे संकेत मिळत आहेत.
विश्वासार्हता गमावण्यात भाजप नेते आघाडीवर
2014 ते 2019 या दहा वर्षांत भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दोन कोटी रोजगार देण्यासह अनेक आश्वासने पाळली नाही. त्यामुळे गडकरी म्हणतात त्याप्रमाणे ‘नेते जे बोलतात ते करीत नाही ‘ हे त्यांच्याच पक्षातील नेत्यांसाठी लागू आहे. या कडे विरोधी पक्षांतील नेत्यांनी लक्ष वेधले.