टिळकनगरातील समाज मंदिर हॉल व्यावसायिक वापरासाठी देण्यास विरोध

चेंबूरच्या टिळक नगरमधील नूतनीकरण केलेले समाज मंदिर सभागृह म्हाडाने व्यावसायिक वापरासाठी देण्यासाठी निविदा काढली आहे. परंतु म्हाडाच्या या धोरणाला टिळक नगरमधील रहिवाशांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. यासाठी ‘टिळक नगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन’ (टीएनआरडब्ल्यूए) च्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी टिळक नगर मैदानात आंदोलन केले आहे.

म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना यासंबंधीचे पत्र पाठवण्यात आले असून या पत्रात म्हटले आहे की, टिळक नगरचे समाज मंदिर सभागृह हे रहिवाशांच्या कल्याणकारी उपक्रमासाठी आणि सामाजिक कार्यासाठी बांधले गेले होते. नूतनीकरण झाल्यानंतर हे समाज मंदिर सभागृह व्यावसायिक वापरासाठी देणे म्हणजे रहिवाशांचे हक्क आणि हिताची पायमल्ली करण्यासारखे आहे.

म्हाडाने काढलेल्या व्यावसायिक निविदेमुळे रहिवाशांना प्रचंड धक्का बसला आहे. त्यामुळे म्हाडाने ही निविदा त्वरित मागे घ्यावी. समाज मंदिर सभागृह हे रहिवाशांना सामाजिक वापरासाठी राखून ठेवावे, म्हाडाने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक रहिवासी यांच्यासोबत चर्चा करावी, अशा मागण्या पत्राद्वारे केल्या आहेत.

समाज मंदिराचा वापर स्थानिक रहिवाशांच्या कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी म्हणून वापरले जाणे अपेक्षित आहे. हे सभागृह व्यावसायिक वापरासाठी दिल्यानंतर स्थानिक रहिवाशांना या सभागृहाचे भाडे परवडणार नाही.

स्थानिक रहिवासीऐवजी बाहेरचे लोक या ठिकाणी कार्यक्रमासाठी येतील. हे स्थानिक रहिवाशांवर अन्याय करण्यासारखे ठरेल. समाज मंदिराचा मूळ उद्देश सामाजिक एकता व बंधूता वाढवणे हा आहे. त्यामुळे म्हाडाने या सभागृहाचा वापर व्यावसायिकतेसाठी देऊ नये अशी आमची मागणी आहे, असे आंदोलनकर्त्या रहिवाशांनी म्हटले आहे.

…तर कायदेशीर लढाई लढू!

आम्ही पाठवलेल्या पत्राचा म्हाडाने गांभीर्याने विचार करून काढलेली निविदा रद्द करावी. व्यावसायिक वापरासाठी हे सभागृह देऊ नये, ही स्थानिक रहिवाशांची मागणी मान्य करावी. जर म्हाडाने आमच्या मागणीवर विचार केला नाही तर आम्ही म्हाडाच्या निर्णयाविरोधात कोर्टात धावू घेऊ, असे ‘टीएनआरडब्ल्यूए’चे अध्यक्ष अॅड. नितीन निकम यांनी ‘सामना’शी बोलताना सांगितले.