>>गणेश भोसले
‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया’, ‘दिवाणजी खोबरं…’च्या जयघोषात आज रविवारी श्री गणपती पंचायतन देवस्थानचा 245वा रथोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. तब्बल पाच तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या रथोत्सवात राज्यभरातून दीड लाखावर भाविक उपस्थित होते. तसेच आज रथोत्सवादिवशी तासगाव येथील दीड दिवसाच्या गणपतींनाही निरोप देण्यात आला.
रविवारी सकाळी विधिवत पूजा झाल्यानंतर दुपारी एक वाजता रथोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. दोन दोरखंडांच्या साहाय्याने 30 फूट उंचीचा लाकडी रथ ओढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. गणपती मंदिर ते श्री काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत रथ ओढण्यात आला. श्री गणपती पंचायतन देवस्थानची राजवाडय़ात प्रतिष्ठापना केलेली शाडू मातीची मूर्ती आणि संस्थानची 125 किलोची पंचधातूची मूर्ती पालखीतून वाजतगाजत मंदिरातून आणण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’, ‘दिवाणजी खोबरं…’च्या जयघोषात रथ ओढण्यास सुरुवात केली. यावेळी गुलाल-पेढय़ांची उधळण करण्यात आली. युवकांनी रथासमोर केलेले मानवी मनोरे, झांज पथक, गौरी हत्ती यामुळे वातावरण भारावून गेले होते. रथयात्रेच्या दुतर्फा उभे असलेले भाविक रथावर फुले-पेढय़ांचा व गुलालाचा वर्षाव करीत होते. रथ काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत गेल्यानंतर ‘श्रीं’च्या शाडूच्या मूर्तीचे विसर्जन कपूर नाल्यात करण्यात आले. विसर्जनानंतर पंचधातूच्या मूर्तीसह रथ पुन्हा गणपती मंदिराकडे आणण्यात आला.
रथ उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री गणपती पंचायतनचे श्रीमंत राजेंद्र परशुराम पटवर्धन, डॉ. अदिती पटवर्धन, श्रीमंत सीताराम राजेंद्र पटवर्धन यांच्यासह बारा बलुतेदार, मानकऱयांनी परिश्रम घेतले. तासगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विशाल मोहिते यांनी रथाची पाहणी करून तहसीलदार अतुल पाटोळे यांना अहवाल दिल्यानंतर रथ ओढण्यास परवानगी दिली.
तासगावच्या उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाचा रथोत्सवही उत्साहात पार पडला. 30 फूट उंचीचा लाकडी रथ फुले, केळीचे खुंट व उसाने यांनी सजला होता. हजारो भाविक रथ ओढत असताना पेढे-खोबऱयाची मागणी करीत होते. रथातून भाविकांच्या दिशेने प्रसादाची व गुलालाची उधळण करण्यात येत होती. एकाच वेळी गुलालाने हजारो युवक रथ ओढताना ‘मोरया… मोरया…’चा जयघोष करीत होते. रथयात्रेच्या दुतर्फा उभे असलेले भाविक रथावर फुले-पेढय़ांचा वर्षाव करीत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे, जिल्हा पोलीसप्रमुख संदीप घुगे, डीवायएसपी सचिन थोराबोले, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता विशाल मोहिते, नगरपालिका मुख्याधिकारी पृथ्वीराज माने-पाटील, तासगाव सर्कल तुकाराम तळपे, तलाठी पतंग माने, तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने, तसेच खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तासगाव तालुकाप्रमुख प्रदीप माने, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण, रोहित पाटील, धारेश्वर कोल्ड स्टोअरेजचे मालक सचिन पाटील, स्वामी रामानंद सूतगिरणी संस्थेचे अध्यक्ष पतंग माने, अनिल जाधव, संजय देसाई, सबरजिस्ट्रार सुनील पाथरवट आदी उपस्थित होते.