घरात फूट पाडून चूक केली, अजित पवार यांची कबुली

घरात फूट पाडून चूक केली, अशी जाहीर कबुलीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोलीतील एका सभेत बोलताना दिली. कुटुंबातील फूट समाज स्वीकारत नाही, त्यामुळे तुम्ही अशी चूक करू नका असा सल्ला वडिलांविरोधात बंडाचा झेंडा उगारलेल्या धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना पवार यांनी दिला. पवार यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

वडील सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलीवर करतो. त्यामुळे नात्यात दुही निर्माण करू नका, धर्मराव बाबा आत्राम यांच्यासोबतच राहा, नात्यातील फूट समाजाला आवडत नाही. याचा अनुभव आम्ही घेतला आहे, असे अजित पवार म्हणाले. वस्ताद एक डाव कायम आपल्याकडे राखून ठेवत असतो., तो शिष्याला सांगत नाही. तो डाव आम्हाला वापरायला लावू नका, असा इशाराही अजित पवार यांनी भाग्यश्री आत्राम यांना दिला.

… तर झाकली मूठ सव्वा लाखाची राहिलेली बरी

बारामतीसाठी मोठ्या प्रमाणावर कामे करूनही निवडणुकीत गंमत होणार असेल तर उभे न राहिलेले बरे, झाकली मूठ सव्वा लाखाची राहिलेली बरी. मी पहिल्यापासून लाखाच्या मताधिक्याने निवडून येत होतो. आता मी 65 वर्षांचा झालो, समाधानी आहे. जिथे पिकते तिथे विकले जात नाही. मी सोडून दुसरा कुणी तरी आमदार बारामतीकरांना मिळाला पाहिजे. मग तुम्ही माझी 1991 ते 2024 या कालावधीतील तुलना त्यांच्याशी केल्यावर काय ते लक्षात येईल, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पक्ष फोडणऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत आहे का?

ज्या पक्षाने कुटुंब फोडले त्यांना त्याचा जाब विचारण्याची हिंमत अजित पवारांमध्ये आहे का, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. तुम्ही माझ्याकडून काय करून घेतले, हे भाजपाला विचारण्याचे धाडस अजित पवार यांच्यात आहे का? मुळात लोकसभा निवडणुकीत लोकांनी अजित पवारांना नाकारले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी कंपनीला 200 कोटी रुपयांचे कंत्राट दिले. ती कंपनी लोकांच्या भावनांचा अभ्यास करते, त्यातून नेत्यांच्या तोंडून अशी विधाने येतात असा सणसणीत टोलाही त्यांनी अजित पवार यांना लगावला.