नागपुरात एका 51 वर्षीय व्यक्तीच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी 60 लाख रुपये लांबवले. या धक्क्यातून या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. नागपूरच्या गणेशपेठ भागात ही धक्कादायक घटना घडली आहे.
अक्षय बहेकर हे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून काम करत होते. एका सायबर फ्रॉडमध्ये त्यांनी आपल्या खात्यातले 60 लाख रुपये गमावले. त्यामुळे बहेकर नैराश्यात गेले होते. 3 सप्टेंबरला बहेकर गणेशपेठेतल्या एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले. त्यांनी एक रुम बुक केली आणि आत गेले. पण खुप वेळ झाला ते बाहेरच नाही आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय आला, त्यांनी बहेकर यांना आवाज दिला पण आतून प्रतिसाद आला नाही. तेव्हा नाईलाजाने कर्मचाऱ्यांनी चावीने दरवाजा उघडला. तेव्हा बहेकर बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात ऑनलाईन फ्रॉडमधून 60 लाख रुपये गमावल्याचे त्यांनी म्हटले आहे. बहेकर यांनी विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.