दापोली तालुक्यातील ज्या 32 गावांचे प्रतिनिधित्व रामदास कदम यांनी केले होते. त्या 32 गावातील तामोंड या गावानंतर आता पांगारी खापरे वाडीने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशीच आपली निष्ठा असल्याचे दाखवत ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
पूर्वीच्या खेड विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली तालुक्यातील 32 गावांचे आमदार म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने आताच्या मिंधे गटाच्या रामदास कदम यांनी नेतृत्व केले होते. तर आता त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम हे दापोली विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या याच 32 गावांचे आमदार म्हणून लोकप्रतिनिधी या नात्याने नेतृत्व करत आहेत. अशा या एकहाती नेतृत्व असलेल्या पारंपरिक मतदारसंघातील 32 गावातील पांगारी गावाच्या सर्वात मोठ्या खापरे वाडीने ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत श्री. राधा कृष्ण नवतरुण विकास मंडळ पांगारी खापरे वाडी, ता. दापोली या संपूर्ण वाडीने मंडळाचे अध्यक्ष सुरेश पोसरेकर आणि सचिव जनार्दन खापरे यांच्यासह देवजी खापरे, सोनू पोसरेकर आदी वाडी सदस्यांसह मुंबई आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमात बोलताना जिल्हा प्रमुख संजय कदम म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे ज्या परिस्थितीत पक्ष संघटन पुढे नेत आहेत. तोच विचार केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशहिताचा आणि देशाला तारणारा आहे हे ओळखून देशहितासाठी अनेक जण हे ते सध्या कार्यरत असलेला पक्ष सोडून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या पक्षात पक्ष प्रवेश करत आहेत. हा शिवसेना पक्ष नेतृत्वावरील विश्वास म्हणजेच सत्ता परिवर्तनाची नांदी आहे. तुम्ही ज्या विश्वासाने शिवसेनेत आलात त्या तुमच्या विश्वासाला शिवसेननेकडून कधीच तडा जाऊ दिला जाणार नाही अशा प्रकारचा विश्वास प्रवेशकर्त्यांना जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी दिला.