Ganeshotsav 2024 – गणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायणाची पूजा करू नये; जाणून घ्या कारण…

>> योगेश जोशी

सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आता आगमन झाले आहे. त्याच्या पूजाअर्चनेची सर्वत्र लगबग सुरू आहे. अनेक ठिकाणी गणेशोत्सवात सत्यनारायणाची पूजा करण्यात येते. घरात येणाऱ्या बाप्पांसमोर अनेकजण सत्यनारायणाची पूजाही करतात. तसेच अनेक मंडळांकडूनही सत्यनारायणाची पूजा करण्यात येते. मात्र, गणेशोत्सवात गणपती हेच उपास्य दैवत असून या काळात सत्यनारायण पूजा करणे अयोग्य असल्याचे गणेश उपासकांनी सांगितले.

निर्गुण, निराकार स्वरुपात सर्व देव एकच असले तरी जेव्हा सगुण, साकार स्वरुपात एखाद्या देवतेची उपासना करण्यात येते, तेव्हा तिच उपास्य दैवत असते. गणेशोत्सवात गणपती हेच उपास्य दैवत असल्याने या काळात गणेशाची उपासना करणे योग्य असल्याचे गणेश उपासकांचे म्हणणे आहे. गणेशोत्सवात सत्यनारायणाची पूजा करण्याला शास्त्रात आधार नसल्याचे त्यांनी सांगितले. उपास्य देवेतेसमोर त्याच देवतेची पूजा करावी, असे शास्त्र सांगते.

शास्त्राच्या या मतानुसार गणेशोत्सवात कोणती पूजा करायची असेल तर ते सत्यविनायकाचीच करावी. प्रत्येक देवतेच्या पूजेचे असे ठराविक व्रत आणि विधी आहेत. सत्यनारायण पूजेबाबत आपल्याला आदर आहे. तसेच सत्यनारायण कथेत ती पूजा कधीही करावी, त्याला तिथी, वार, नक्षत्र, योग अशी बंधने नाहीत. मात्र, गणेशोत्सवात गणपती बाप्पा हेच उपास्य दैवत असल्याने सत्यविनायकाची पूजा करणे, योग्य ठरते.

सत्यनारायण पूजेत भगवान श्रीकृष्ण पूज्य आहेत. तर सत्यविनायक पूजेत श्रीकृष्ण पूजक असून गणेश पूज्य आहेत. ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी सृष्टीचे पालन करता यावे, यासाठी भगवान विष्णूंनी हे व्रत केल्याची माहिती भगवान शिव पार्वतीला सांगत आहे, अशी कथा या व्रताची आहे. या व्रतात सर्व पंचश्वेर श्रीगणेशाची उपासना करत असल्याचे या व्रतात आहे. त्यामुळे गणेशोत्सवात सत्यविनायक पूजा करण्यालाच शास्त्राधार असल्याचे दिसून येते. सत्यनारायण पूजेला कोणतीही बंधने नसल्याने तीदेखील करता येऊ शकते. मात्र, या काळात गणेशत्त्वाच्या पुजेला महत्त्व असल्याचे शास्त्रात म्हटले आहे.