भाजप कार्यकर्त्याकडून विद्यार्थिनीवर बलात्कार, 40 दिवसांनंतर अटक

भाजप कार्यकर्त्याने एका विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. 40 दिवस फरार असल्यानंतर आरोपीने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी गुजरातच्या राजकोटमध्ये एका शैक्षणिक संस्थेत शिकत होती. तसेच याच शैक्षणिक संस्थेतल्या हॉस्टेलमध्ये रेक्टर म्हणून काम करत होती. आरोपी विजय रादडिया आणि मधू धधानी हे संस्थेच्या विश्वस्ताच्या ओळखीचे होते. त्यामुळे कॅम्पसमध्ये त्यांचं येणंजाणं होतं. 2023 पासून विजय आणि मधूने या तरुणीला डोळे मारणे आणि स्माईल द्यायला सुरूवात केली. 15 दिवसानंतर या दोघांनी तरुणीला फोन करून कॉलेजला जाऊ नकोस हॉस्टेलच्या रुमवरच थांब असे सांगितले. त्यानंतर या दोघांनी मिळून तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला.

मे 2024 मध्ये पीडित तरुणी पुढच्या शिक्षणासाठी सुरतला निघून गेली. तेव्हा मधू धधानीने तरुणीला गाठलं. तिच्यावर अत्याचार केला. तसेच लग्नासाठी दबाव टाकला. मी सोडून दुसऱ्याशी लग्न केलंस तर याद राख अशी धमकीही मधूने या तरुणीला दिली. तरुणीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ मधूला अटक केली. पण या घटनेतला दुसरा आरोपी विजय हा भाजप कार्यकर्ता आहे. त्याची बायको जिल्हा परिषदेची सदस्य आहे. विजयचा पत्नीने विजयसाठी अटकपूर्व जामीन मागितला, पण कोर्टाने तो फेटाळून लावला. अखेर 40 दिवस फरार असलेल्या विजयने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. पोलिसांनी विजयची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.