राज्यातील महायुतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार यावं; एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली भावना

एकनाथ खडसे सध्या नेमके कोणत्या पक्षात आहेत, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. आपला भाजपत प्रवेश झाला असून राज्यातील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्याची घोषणा झाली नसल्याची खदखद एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली होती. आपला पक्षप्रवेश पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत झाला होता. त्याची घोषणा झाली नाही, यावरून राज्यातील काही नेते पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यापेक्षा मोठे आहेत का, असा सवाल करत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला होता. आता पुन्हा एकदा खडसे यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

राज्यातील महायुतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार यावं, असं आपल्याला वाटत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच गेल्या काही महिन्यांमधील महायुतीचा अनुभव चांगला नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. महायुती सरकार फोडाफोडीचे राजकारण करत आहे. सूडबुध्दीने ईडी, सीबीआय सारख्या कारवाया करत आहेत. उट्टे काढण्याचं काम करत असल्याने जनतेची कामं होत नसल्याची खंतही खडसे यांनी व्यक्त केली.

लाडकी बहीण योजनेला 46 हजार कोटी देण्याऐवजी ते पैसे धरणे, रस्ते निर्मितीसाठी वापरले असते तर त्यातून स्थावर मालमत्ता निर्माण झाली असती. लाडकी बहीण योजना सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आणल्याचं जनतेलाही कळते. ही योजना आणायची होती तर पाच वर्षांपूर्वीच आणायला पाहिजे होती, असं एकनाथ खडसे म्हणाले. या योजनेला आपला विरोध नाही. या योजनेवरील खर्च हा नॉन प्लॅन खर्च आहे. एवढाच खर्च जर धरणे उभारणी ,रस्ते निर्मिती साठी केला गेला तर त्यातून रोजगार निर्मिती झाली असती.

फोडाफोडीचं राजकारण, एकमेकांचे उट्टे काढण्याची चढाओढ, जनतेची रखडलेली कामे, ईडी, सीबीआयचा गैरवापर करत होणारे सूडाचे राजकारण या सर्व गोष्टींचा विचार करता राज्यातील महायुतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार यावे, अशी आपली भावना असल्याचे मत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.