गणेश चतुर्थी असल्याने आज घराघरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी वरुणराजाही सज्ज असून गणारायाच्या आगमनावेळी राज्यात अनेक ठिकाणी जलधारा कोसळणार आहेत. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामानात बदल झाल्याने शनिवारपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यात पुन्हा एकदा हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे, सातारा, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज आहे. पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्यावर काही भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील पावसाची तीव्रता शुक्रवारपासून वाढली आहे. आगामी तीन दिवसात कोकणासह पुणे, सातारा भागात अतिवृष्टीची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.