>> योगेश जोशी
आज राज्यासह देशभराच मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना करण्यात येत आहे. आजच्या दिवशी विधीवर भक्तीभावाने श्रीगणेशाचे पूजन करण्यात येते. मात्र, आजच्या दिवशी एक चूक करणे कटाक्षाने टाळावे. गणेशाच्या आगमनाच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन करू नये, असे सांगितले जाते. यामागे नेमकी काय कथा आहे, ते जाणून घेऊ…
प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला चंद्र दर्शन करूनच उपवास सोडण्यात येतो. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते. मात्र, श्रीगणरायाच्या स्थापनेच्या दिवशीच चंद्रदर्शन का करू नये, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो. गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन अशुभ मानलं जातं. त्यामागे तसे कारणही आहे, ते आपण जाणून घेऊ…
एका पौराणिक कथेनुसार एके दिवशी भगवान गणेश आपले वाहन असलेले मुषक म्हणजे उंदरावर स्वार होऊन फिरायला निघाले होते. गणपती डौलदार आणि लंबोदर तर त्याचे वाहन मूषक खूपचे छोटे…ही जोडी पाहून चंद्राला गंमत वाटली. त्याचवेळी अचानक उंदीर अडखळला. त्यामुळे बाप्पांनाही धक्का बसला. हे सर्व गंमतीने पाहत असलेल्या चंद्राला हसू अनावर झाले.हे पाहून चंद्र हसला आणि बाप्पाला राग आला. त्यांनी चंद्राला शाप दिला की, दिवसेंदिवस तू क्षीण होत जाशील आणि अमावस्येला नाहीसा होशील.
बाप्पाने दिलेल्या शापामुळे चंद्राला आपली चूक समजली आणि त्याचे बाप्पांची क्षमा मागितली. चंद्राला पश्चात्ताप झाल्याचे पाहून बाप्पाने चंद्राला सांगितले की, मी माझा शाप मागे घेऊ शकत नाही. मात्र, माझ्या शापमुळे तू क्षीण होत अमावस्येला नाहीसा होशील, तसेच अमावस्येनंतर कलेकलेने वाढत पोर्णिमेला तू पूर्ण रुपात येशील. तसेच तू केलेल्या चुकीची आठवण म्हणून गणेश चतुर्थीला कोणीही तुझे दर्श घेणार नाही. जो चंद्र दर्शन घेईल, त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल. तसेच कोणाला चुकून चंद्रदर्शन घडले तर या दिवशी त्यांनी माझई पूजाअर्चना करत अर्थवशीर्षाचे पठण करावे, म्हणजे चंद्रदर्शाचा दोष लागणार नाही.
गणेश चतुर्थीला तुझे दर्शन निषिद्ध असेल, तर संकष्ट चतुर्थीचे व्रत आणि उपवास करणाऱ्यांनी या दिवशी चंद्रदर्शन करून उपवास सोडावा. त्यामुळे या दिवशी माझ्यासह तुझीही आठवण राहील, असा आशिर्वाद बाप्पांनी चंद्राला दिला. या कथेनुसार गणेश चुतुर्थीला चंद्र दर्शन करत नाही. तर संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन करूनच उपवास सोडतात, असे सांगण्यात येते.