Manipur Attack – मणिपूरमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ रॉकेट हल्ला, एकाचा मृत्यू; पाच गंभीर जखमी

मणिपूरमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ संशयित दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग येथील निवासी भागात शुक्रवारी दुपारी रॉकेट डागण्यात आले. या स्फोटात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या वृत्तानुसार, माजी मुख्यमंत्री मारेम्बम कोईरेंग यांच्या इंफाळमधील निवासस्थान असलेल्या परिसरात अचानक एक रॉकेट आले, त्यानंतर स्फोट झाला. या जिल्ह्यात डागण्यात आलेले हे दुसरे रॉकेट आहे. याआधी इंफाळपासून सुमारे 45 किमी अंतरावर असलेल्या ट्रोंगलाओबीच्या निवासी भागात रॉकेट डागण्यात आले होते.

शुक्रवारी स्फोट झाला तेव्हा या परिसरातील वृद्ध व्यक्ती धार्मिक कार्यक्रमाची तयारी करत होते. त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर 13 वर्षाच्या मुलीसह पाच जण या स्फोटात जखमी झाले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

आयएनए मुख्यालयापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर हे रॉकेट डागण्यात आले. फायर केलेल्या रॉकेटची रेंज 3 किलोमीटरपेक्षा जास्त असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान संशयित दहशतवाद्यांनी शुक्रवारी बॉम्बहल्लाही केला. या हल्ल्यात दोन इमारतींचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.