मुंबई महानगरपालिकेतील लिपिक भरती परीक्षेतील जाचक अटींविरोधात युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. लिपिक भरती परीक्षेतील जाचक अटी रद्द करण्याची सूचना पत्रातून केली आहे. या पत्रावरून आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर हे पत्र पोस्ट केले आहे. तसेच ‘क्रेडिट घेण्याचं राजकारण नको, आदेश जारी करा’, असा टोला लगावला. ‘पण… नगरविकास खातं तुमचं ऐकणार का?’ असा बोचरा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेने लिपिक भरतीसाठी जाहिरात काढली आहे. या जाहीरातीत शालांत परीक्षा आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच अर्ज करता येईल अशी जाचक अट घातली आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी आवाज उठवत मिंधे सरकारचा चांगलाच समाचार घेतला.
यानंतर देवेंद्र फडवणीस यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहले आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे पहिल्या संधीत पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या आणि वरील पदावर अर्ज करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. अशा उमेदवारांना संधीचा लाभ घेता यावा यासाठी सदर अट रद्द करण्यास सांगितले आहे.