हे कोणते औषध..? व्हायरल प्रिस्क्रिप्शन पाहून सगळेच चक्रावले; डॉक्टरला बजावली नोटीस

मध्य प्रदेशातील सतना येथील एका रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. डॉक्टरांनी असे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले, जे पाहून रुग्णापासून औषधांच्या दुकानापर्यंत सगळेच पेचात पडले आहेत. औषध विकणाऱ्या दुकानदारांनी अनेक वेळा प्रिस्क्रिप्शन वाचण्याचा प्रयत्न केला. पण प्रिस्क्रिप्शनच्या विचित्र लिखाणामुळे ते वाचताच आले नाही. डॉक्टरांच्या अशा हस्ताक्षरामुळे रुग्णाला वेळेत औषधे मिळत नाहीत. त्यामुळे या प्रकरणी संबंधित डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली आहे.

नागौड येथील सरकारी रुग्णालयात हा सगळा प्रकार घडला. रहिकवाडा येथील रहिवासी अरविंद कुमार सेन हे कुटुंबीयांसह नागौड येथील सरकारी रुग्णालयात गेले होते. अरविंद अंगदुखी आणि तापाची तक्रार घेऊन रुग्णालयात पोहोचले होते. यावेळी त्यांनी ओपीडीमध्ये डॉ. अमित सोनी यांची भेट घेतली. त्यानंतर डॉक्टर अमित सोनी यांनी अरविंद यांना तपासून एका प्रिस्क्रिप्शनवर औषधांची नावे लिहून दिली. हे प्रिस्क्रिप्शन बघून अरविंद चक्राऊन गेले. मात्र आपल्याला यातील ज्ञान नाही त्यामुळे कसलाही विचार न करता तो मेडिकलमध्ये गेले.

अरविंदने मेडिकलमध्ये डॉक्टरांनी लिहून दिलेले प्रिस्क्रिपशन दिले. मात्र त्याला यावरील एकही अक्षर मेडिकल दुकानदाराला वाचता आले नाही. त्यामुळे अरविंद अजून दुसऱ्या दोन तीन मेडिकलमध्ये गेले. मात्र त्यांनाही हे प्रिस्क्रिप्शन वाचता आले नाही. कारण प्रिस्क्रिप्शनमध्ये कोणतीही औषधे लिहिलेली नव्हती. त्यात औषधांची नावे नसून आकडे लिहिले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या प्रिस्क्रिप्शनचा फोटो एका मेडिकलवाल्यानेच व्हायरल केला आहे.

दरम्यान, ही बाब गांभीर्याने घेत सतना येथील मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित डॉक्टरांना नोटीस बजावून या प्रकरणाचा जाब विचारला आहे. तसेच डॉक्टरांच्या अयोग्य हस्ताक्षरामुळे रुग्णांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीही अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे आता डॉक्टरांनी हस्ताक्षर सुधरवण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.