जेवणाच्या डब्यामध्ये मांसाहारी पदार्थ आणल्याने विद्यार्थ्याला शाळेतून काढल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथील एका खासगी शाळेमध्ये घडला आहे. एवढेच नाही तर याची तक्रार घेऊन शाळेत पोहोचलेल्या मुलाच्या आईशीही मुख्याध्यापकांनी हुज्जात घातली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे.
उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथील जोया रोडवर असणाऱ्या एका खासगी शाळेतील मुख्याध्यापकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाळेत शिकणाऱ्या 7 वर्षीय मुलाने डब्यामध्ये मांसाहारी पदार्थ आणल्याचा आरोप ते करतात आणि विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकतात. याचा जाब विचारण्यासाठी शाळेत आलेल्या मुलाच्या आईसोबतही त्यांची खडाजंगी होते.
शाळेत मांसाहारी पदार्थ आणणाऱ्या, मोठे झाल्यावर आमची मंदिरं तोडणाऱ्या विद्यार्थ्याला आम्ही शिकवणार नाही, अशी भूमिका मुख्याध्यापक घेतात. तसेच तुमचा मुलगा प्रत्येकाला मांसाहारी पदार्थ देण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वांना मुसलमान बनवणार असल्याचे म्हणतो, असा आरोपही मुख्याध्यापक करतात. मात्र मुलाची आई त्याने शाळेत मांसाहार आणला नसल्याचे म्हणते.
सात वर्षांचा मुलगा धर्माच्या गोष्टी करू शकत नाही, असा प्रतिवाद मुलाची आई करते. यामुळे मुख्याध्यापक आणखीनच खवळतात आणि पालकांकडून त्यांना हे शिकवले जात असल्याचा आरोप करतात. तसेच इतर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारी येत असल्याने त्याला शाळेतून काढून टाकल्याचे म्हणतात.
दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुसलमान समाज आक्रमक झाला आहे. अमरोहाच्या मुसलमान समाजाने समिती स्थापन करत एक बैठक घेतली. एसडीएमच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे संबंधित मुख्याध्यापकाची तक्रार केली आणि कारवाईची मागणी केली. शिक्षण अधिकाऱ्यांनीही या व्हिडीओची दखल घेत 3 सरकारी कॉलेजच्या प्राचार्यांची समिथी स्थापन करून तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.