बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत मिळालेल्या दारुण आणि लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघाला तोंड लपवायलासुद्धा जागा उरलेली नाही. त्यामुळे इंग्लंडविरुद्धची मालिका पाकिस्तानात न खेळवता श्रीलंका किंवा यूएईमध्ये आयोजित करण्याची पर्यायी व्यवस्था पीसीबीकडून आखली जात आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना कराची येथे खेळविला जाणार होता, मात्र कराची स्टेडियमचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे तो सामना रावळपिंडी येथे हलवण्यात आला. आता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनासाठी कराची नॅशनल स्टेडियम, लाहोरच्या गद्दाफी स्टेडियम आणि रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये युद्धपातळीवर नूतनीकरण सुरू आहे. त्यामुळे आगामी इंग्लंडविरुद्धची मालिका श्रीलंका किंवा यूएई येथे खेळविण्याबाबत पीसीबी विचार करत आहे.
आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या कार्यक्रमानुसार पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करावे लागणार आहे. ही मालिका ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. जर पीसीबीने या मैदानांऐवजी पर्यायी मैदानांचा विचार केल्यास अबुधाबी हाच एकमेव पर्याय उरतो.