दुलीप ट्रॉफीत स्टार फ्लॉप, मुशीर खानच्या बॅटीतून आणखी एक झुंजार शतक

हिंदुस्थानच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत स्टार कसोटीपटू ऋषभ पंत, यशस्वी जैसवाल, सरफराज खान आणि श्रेयस अय्यर हे फ्लॉप ठरले आहेत. मात्र दुलीप ट्रॉफीत प्रथमच खेळत असलेल्या मुशीर खानने 105 धावांची झुंजार आणि अभेद्य खेळी करत हिंदुस्थान ‘ब’ संघाला सावरले. हिंदुस्थान ‘अ’ संघाविरुद्धच्या चारदिवसीय सामन्यात हिंदुस्थान ‘ब’ संघाने पहिल्या दिवसअखेर 7 बाद 202 अशी मजल मारली होती.

बांगलादेशविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी हिंदुस्थानी संघात निवड करण्याच्या दृष्टीने दुलीप ट्रॉफी हिंदुस्थानचे अनेक कसोटीपटू खेळत होते. ऋषभ पंत कार अपघातामुळे गेल्या मोसमात खेळला नव्हता, मात्र कसोटी संघात निवड व्हावी म्हणून तो दुलीप ट्रॉफीमध्ये उतरला होता, पण तो 7 धावांवरच बाद झाला. त्यातच यशस्वी जैसवाल, सरफराज खान आणि वॉशिंग्टन सुंदर हे कसोटीपटूही अपयशी ठरल्यामुळे हिंदुस्थानी निवड समितीची चांगलीच पंचाईत झाली आहे.

हिंदुस्थानच्या ‘अ’ संघातही शुबमन गिल, मयांक अगरवाल, रियान पराग, के. एल. राहुल, ध्रुव जुरेल, शिवम दुबे, कुलदीप यादवसारखे नामांकित खेळत आहेत. मुशीरने मनं जिंकली 19 वर्षीय मुशीर खानने पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली. गेल्या वर्षी 19 वर्षांखालील मुलांच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर त्याने रणजी करंडकाच्या अखेरच्या तीन सामन्यांत खेळताना नाबाद 203, 33, 55, 6 आणि 136 अशा खेळी साकारल्या होत्या. आजही त्याने असाच खेळ साकारला.

हिंदुस्थान ‘ब’ संघाचा कर्णधार असलेल्या अभिमन्यू ईश्वरनची विकेट पडल्यानंतर आलेल्या मुशीरने एकहाती किल्ला लढवला. त्याला एकाही दिग्गजाची साथ लाभली नाही. खलील अहमद, आकाश दीप आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेत हिंदुस्थान ‘ब’ संघाची 7 बाद 94 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. तेव्हा नवदीप सैनीसह त्याने 108 धावांची झुंजार भागी रचत संघाला संकटातून बाहेर काढले.

मुशीरने आपले प्रथम श्रेणी क्रिकेटमधील तिसरे शतक 205 चेंडूंत साकारले. त्याने आपल्या या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्याला 69 धावांवर जीवदानही लाभले आणि त्याने या जीवदानाचा फायदा घेत आपले शतकही साजरे केले.

अक्षर पटेलने सावरले

हिंदुस्थान ‘ब’ संघाप्रमाणे हिंदुस्थान ‘ड’ संघाचीही दारुण अवस्था झाली होती. त्यांचेही 8 फलंदाज 76 धावांतच गारद झाले होते. मात्र यानंतर अक्षर पटेलने 86 धावांची खणखणीत खेळी करत संघाला 164 धावांपर्यंत नेली. तसेच त्यानंतर अक्षरने आपल्या गोलंदाजीतही चमक दाखवताना 2 विकेट टिपत हिंदुस्थान ‘क’ संघाची पहिल्या दिवसअखेर 4 बाद 91 अशी स्थिती केली.

हर्षित राणाने कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शनला बाद करत ‘क’ संघाची 2 बाद 14 अशी अवस्था केली होती आणि त्यानंतर पटेलने आपल्या सहा चेंडूंत रजत पाटीदार (13) आणि आर्यन जुयल (12) यांचे विकट टिपत 4 बाद 43 अशी बिकट अवस्था केली. त्यानंतर अभिषेक पोरेल आणि बाबा इंद्रजीतने 48 धावांची अभेद्य भागी रचत संघाची पडझड रोखली.