बटलर नव्हे फिल सॉल्ट इंग्लिश कर्णधार

जोस बटलरकडे असलेले इंग्लिश टी-20 क्रिकेटचे नेतृत्व फिल सॉल्टकडे सोपविण्यात आले आहे. बटलरच्या पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघात हा बदल करण्यात आला आहे. या दुखापतीमुळे बटलर महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या वन डे मालिकेतही संघात नसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी बटलरचे बाहेर होणे हे इंग्लंड संघासाठी खूप मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. तसेच अष्टपैलू जेमी ओव्हरटनला त्याच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय जॉर्डन कॉक्सलाही संधी देण्यात आली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 11, दुसरा सामना 13 आणि तिसरा सामना 15 सप्टेंबरला खेळविला जाणार आहे.

इंग्लंडचा टी-20 संघ ः फिल सॉल्ट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मुसली, जेमी ओव्हरटन, आदिल राशीद, रीस टॉपली, जॉन टर्नर.