पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते विरार स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अतिरिक्त मार्गिकांच्या कामात अडथळा ठरलेल्या 2612 खारफुटी तोडण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक हिताचा आहे. नव्या मार्गिकांमुळे रेल्वे प्रवास गतिमान होण्याबरोबरच इंधनाची बचत होईल, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
खारफुटी तोडण्यासाठी परवानगी देण्याची विनंती करीत पश्चिम रेल्वे प्रशासनाने याचिका दाखल केली होती. याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या (एमयूटीपी) तिसऱ्या टप्प्यांतर्गत 2184 कोटींच्या खर्चातून बोरिवली ते विरार स्थानकांदरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम केले जात आहे. 26 कि.मी. मार्गावरील या अतिरिक्त मार्गिकांमुळे मुंबई लोकलच्या फेऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन प्रवास आणखी गतिमान होणार आहे. सध्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली या स्थानकांदरम्यान पाच मार्गिका असून सहाव्या मार्गिकेचे बांधकाम सुरू आहे. बोरिवली ते विरारदरम्यान मात्र केवळ चार मार्गिका आहेत.
7823 खारफुटींची पुनर्लागवड करण्याचे पश्चिम रेल्वेला निर्देश
न्यायालयाने व्यापक जनहिताच्या दृष्टिकोनातून पश्चिम रेल्वेच्या दोन अतिरिक्त मार्गिकांसाठी खारफुटी तोडण्यास परवानगी दिली. मात्र पर्यावरणाच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई म्हणून 7823 खारफुटींची पुनर्लागवड करण्याचे निर्देश पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. रेल्वे ही सर्वाधिक इकोफ्रेंडली आणि प्रभावी प्रवासी सेवा देणारी प्रणाली आहे. तसेच नवीन मार्गिका तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्याही उपयुक्त आहे, असे निरीक्षण न्यायालयाने निकालपत्रात नोंदवले आहे.