बाप्पाच्या पूजेसाठी सर्वाधिक डिमांड असणाऱ्या झेंडूने यंदा चांगलाच भाव खाल्ला असून आठवडाभरापूर्वी 60 ते 70 रुपये किलो दराने मिळणाऱ्या झेंडूसाठी आता तब्बल 320 रुपये मोजावे लागतायत. बाप्पाला आवडणाऱ्या जास्वंदाच्या एका फुलासाठी 10 रुपये आकारले जात असून शेवंती, अष्टर, मोगरा, चाफा, जास्वंद या फुलांच्या किमतीही दुपटीने महागल्या आहेत.
होलसेल दरात फुलांच्या खरेदीसाठी मुंबईकरांची पावले दादर, प्रभादेवी, बोरिवली फूल मार्केटमध्ये वळतात. गणेशोत्सवात फुलांची वाढती मागणी आणि त्यातुलनेत कमी प्रमाणात होणारी आवक यामुळे फुलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तरीही बाप्पाच्या स्वागतात काही कमतरता राहू नये म्हणून प्रत्येकजण होऊ दे खर्च म्हणत मनसोक्त फुलांची खरेदी करताना दिसत आहे.
असे आहेत फुलांचे दर
मोगरा – 600 रुपये किलो
शेवंती – 320 रुपये किलो
पिवळा गोंडा – 200 रुपये किलो
मिक्स फुले – 200 रुपये किलो
चाफा – 100 रुपये डझन
जास्वंद – 10 रुपये नग
सांगली, सातारा, जुन्नर आणि पुण्यातून झेंडूच्या फुलांची आवक होते. अवकाळी पावसामुळे झालेली खराब झालेली फुलशेती, वाढत्या मागणीच्या तुलनेत फुलांची कमी झालेली आवक तसेच खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाल्याने वेळेवर माल न पोहोचणे यामुळे झेंडूच्या दरात वाढ झाली आहे. गौरी-गणपती विसर्जनापर्यंत फुलांचे दर चढेच राहतील, असे दादरमधील आमले फ्लॉवर स्टॉलचे मालक पांडुरंग आमले यांनी सांगितले.