गुजरातला पावसाचा तडाखा, पुरामुळे 50 जण दगावले; देशभरात 22 राज्यांत अतिवृष्टीचा इशारा

ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुबलक पावसानंतर सप्टेंबरची सुरुवात पावसाने दणदणीत केली आहे. देशभरात सर्वत्र पाऊस झाल्याने आता प्रत्येक पावसात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये एकट्या गुजरातमध्ये 50 जणांचा बळी पावसाने घेतला आहे. हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि पुरामुळे संपूर्ण दळणवळण ठप्प झाले. केंद्रीय हवामान खात्याने मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेशसह 22 राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. राजस्थानमध्ये सलग तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जून महिन्यात तुरळत ठिकाणी पाऊस झाल्यानंतर अनेक शेतकरी चिंतातूर झाले होते. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर आतापर्यंत पावसाने विश्रांती घेतली नाही. तलाव, धरणे आणि नद्यांना दुधडी गाठल्यानंतर आता सर्वत्र पाणीच पाणी पहायला मिळत आहे. त्यातच आता सलग तीन तीन अतिवृष्टीने नुकसान होत आहे. राजस्थानमधील जोधपूरमध्ये सर्वाधिक 90.6 मिमी पावसाची नोंद झाली. दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. हिमाचल प्रदेशात पावसामुळे 2 राष्ट्रीय महामार्गांसह 119 रस्ते बंद आहेत. महिनाभरात पर्यटनाला मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा फटका बसल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. हवामान खात्याने विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पिवळा अलर्ट जारी केला आहे. राज्यात पावसामुळे आतापर्यंत 153 जणांचा मृत्यू झाला आहे. हरयाणातील पंचकुला येथे वीटभट्टीची भिंत कोसळून तीन मुलांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातही पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला. नागालँडच्या चुमाउकेडिमा जिल्ह्यातील फेरीमा आणि पगला टेकड्यांवर मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने महिलेसह सहा जणांचा मृत्यू झाला. या भागात अनेक नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली.

एनडीआरएफ, एसडीआरसह संरक्षण दल सतर्क

देशभरात सुरू असलेल्या पावसाने हाहाकार माजवला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे आतापर्यंत मृतांचा आकडा दोनशेपार गेला आहे. या पावसळ्यात अनेक वर्षांचे विक्रम मोडीत निघाले असून, सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस राहणार आहे. त्यामुळे देशभरात तीन महिन्यांपासून एनडीआरएफ, एसडीआरसह संरक्षण दल सतर्क आहेत. याकामी स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि स्वंयसेवी संस्था मदतीला येत आहे.