ड्रोनसाठी परवानगी आवश्यक
ड्रोनचा वापर सध्या चांगलाच वाढला आहे. छोटय़ा-छोटय़ा कार्यक्रमांपासून मोठय़ा समारंभांपर्यंत ड्रोनचा वापर केला जातो. परंतु ड्रोनचा वापर करायचा असेल तर त्यासंबंधीची कायदेशीर परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा ड्रोन उडवणाऱयाला एक लाख रुपयांचा दंड आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते. ड्रोन उडवण्यासाठी लायसन्स असणे आवश्यक आहे. ड्रोन उडवण्यासाठी काही कायदेशीर नियम बनवण्यात आले आहेत. याचे पालन करणे गरजेचे आहे. ड्रोन खरेदीसाठी डिजिटल नोंदणी करणे आवश्यक आहे.
उत्तर कोरियात 30 अधिकाऱयांना मृत्युदंड
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने देशातील 30 अधिकाऱयांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. उत्तर कोरियातील पुराचा सामना करण्यात अपयशी ठरल्याबद्दल या अधिकाऱयांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे जुलैमध्ये उत्तर कोरियामध्ये भूस्खलन आणि पूर आला होता. या काळात जवळपास एक हजार लोकांचा मृत्यू झाला होता, तर चार हजार घरे उद्ध्वस्त झाली. किम जोंग उन यांनी स्वतः पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. ज्या अधिकाऱयांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली ते भ्रष्टाचार आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी आढळले. मात्र हे अधिकारी कोण आहेत याची माहिती समोर आलेली नाही. आपत्तीदरम्यान झालेल्या नुकसान आणि मृत्यूसाठी त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.
गलेलठ्ठ पगारासाठी ‘एआय’ आवश्यक
भविष्यात गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱया मिळवायच्या असतील तर एआय शिकण्याशिवाय पर्याय नाही. हिंदुस्थानात 2025 पर्यंत कोणत्या क्षेत्रात भरमसाट पगाराच्या नोकऱया असतील यावर एआय चॅटबॉक्सने अंदाज वर्तवला आहे. यासाठी चॅटजीपीटी आणि गुगल जेमिनी या दोन एआयची मदत घेण्यात आली. एआय स्पेशलिस्ट, मशीन लार्ंनग इंजिनीअर, रोबोटिक्स इंजिनीअर, डेटा सायंटिस्ट, क्वांटम कॉम्प्युटिंग ऍनालिस्ट, बायोटेक्नॉलॉजी रिसर्चर, सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट, फिनटेक स्पेशालिस्ट, स्पेस सायंटिस्ट/ इंजिनीअर, सस्टेनेबल एनर्जी कन्सल्टंट या क्षेत्रांत 30 लाख ते एक कोटी रुपये वार्षिक पगार मिळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला. यात कोणताही औपचारिक संशोधन अहवाल, तज्ञांच्या विश्लेषणाचा आधार घेतलेला नाही.
ऑटोचालकाची तरुणीला मारहाण
बंगळुरूतील एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडियो पाहून नेटीजन्स संताप व्यक्त करत आहेत. व्हिडियोमध्ये रिक्षाचालक दोन तरुणींना शिव्या देताना आणि मारताना दिसत आहे.तरुणींनी राईड कॅन्सल केल्याने रिक्षाचालक संतप्त होऊन दोघींशी भांडायला सुरुवात करतो. या घटनेचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर लोक त्या रिक्षाचालकावर कारवाईची मागणी करत आहेत.
नायजेरियात बोको हरामकडून 100 जणांची हत्या
नायजेरियात बोको हराम या दहशतवादी संघटनेने 100 हून जास्त लोकांची हत्या केली. 500 हून जास्त दहशतवादी बाईकवर आले होते. त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. इमारतीला आग लावली, असे स्थानिकांनी सांगितले. ही घटना योबेच्या तारमुवा परिसरात घडली. हा हल्ला गेल्या वर्षीपेक्षा मोठा होता. बोको हरामने गेल्या 10 वर्षात हजारो लोकांना ठार केले आहे.
बंगळुरूत साडय़ा चोरणाऱया चार महिलांना अटक
दुकानातील साडय़ा चोरणाऱया चार महिलांना पोलिसांनी अटक केली. बंगळुरूमधील जेपी नगर येथील एका दुकानातून साडय़ा चोरणारी महिलांची टोळी रंगेहाथ पकडली गेली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून 17.5 लाख रुपये किमतीच्या 38 साडय़ा जप्त केल्या. या टोळीतील आणखी दोन महिला अद्याप फरार आहेत. या महिला चलाखीने दुकानदाराचे लक्ष विचलित करून साडय़ा चोरायच्या.
चिंता वाढली! ऑगस्टमध्ये कारच्या विक्रीत घसरण
देशात गाडय़ांची विक्री करणाऱया वाहन कंपन्यांची चिंता वाढळी आहे. ऑगस्ट महिन्यात वार्षिक आधारावर कारच्या विक्रीत पाच टक्के घसरण झाल्याची माहिती फाडाने दिली. या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये एकूण 309053 प्रवासी वाहनांची नोंदणी करण्यात आली. परंतु, 2023 ही संख्या 323720 होती. पावसाळा संपल्यानंतर ऐन दिवाळी आधी कार खरेदीत वाढ होईल, असेही सांगितले जात आहे.
अमेरिकन शाळेत गोळीबार, 4 ठार, 9 जण जखमी
अमेरिकेतील जॉर्जिया येथील अपलाची हायस्कूलमध्ये झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 9 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखोराला अटक करण्यात आली असून त्याचे नाव कोल्ट ग्रे असे आहे. तो अवघ्या 14 वर्षांचा असून या शाळेतील विद्यार्थी आहे. ठार झालेल्यांमध्ये दोन शिक्षक आणि दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
आजपासून क्रेडिट कार्डच्या नियमात मोठा बदल
हिंदुस्थानी क्रेडिट कार्ड धारकांसाठी नवीन कार्डसाठी अर्ज करताना किंवा सध्याचे कार्ड नव्या रूपात घेण्यासाठी आता पसंतीचे क्रेडिट कार्ड मिळवता येणार आहे. ही सुविधा उद्या, 6 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. कार्डधारकांना आता आवडते मास्टरकार्ड, रूपे किंवा विजा कार्ड निवडण्याचा अधिकार मिळणार आहे. याआधी ही सुविधा नव्हती. आरबीआयने 6 मार्चला यासंबंधीचे पत्रक काढले होते.