प्रासंगिक – गणेशोत्सव आणि कोकणी माणूस

>> आत्माराम नाटेकर

गणेशोत्सव खऱ्या अर्थाने साजरा होतो कोकणात. इथे घरोघरी गणपती आणण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या या उत्सवाची पूर्वतयारी कोकणी माणूस अगदी देहभान विसरून करतो. आपल्या घरातल्या गणपतीवर फूल घालण्यासाठी गावाकडे नित्यनेमाने जाणारा कोकणी माणूस खरा वारकरीच. गावाकडल्या मातीची ओढ नसणारा कोकणी माणूस शोधूनही सापडणार नाही.

नोकरीधंद्यानिमित्त कोसो अंतर दूर असलेला चाकरमानी गणपतीला आपल्या गावाकडे हमखास जाणारच. एस.टी., खासगी बस वा रेल्वेचे तिकीट मिळो न मिळो, तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने गावाला पोहोचणारच ! गणपतीचे दिवस जवळ आले की, गावाकडले घर, गावची माणसे डोळ्यांसमोर येतात आणि पूर्वीच्या आठवणी डोळ्यांसमोर तरळू लागतात. दोन पिढय़ांची साक्ष देणारे साऱ्या भावकीचे आमचे देवघर. चुलते फौजदार. त्यामुळे दररोज दारी चपलांचा ढीग. हाताने लिंपलेल्या मातीच्या भिंती, माडाचे वासे, मधला धारण काजऱ्याच्या लाकडाचा. घराला दहाबारा खोल्या अन् त्याही वेडय़ावाकडय़ा, लांबलचक पडवी, प्रशस्त वळई, त्याला लागूनच रांदपाची (स्वयंपाकघर) खोली, उजवीकडे देवघर, धान्य ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली, मागील दारच्या पडवीत न्हाणीघर आणि पुढील दाराला लागूनच बैलांचा गोठा.

पावसाळ्यात घराभोवती रान वाढायचे. गणपती पावसाळ्याच्या दिवसांतच येत असल्याने घराभोवती वाढलेले रान, झुडुपे उपटून टाकावी लागत. लाजरीसारख्या दूरवर पसरलेल्या वेली मुळापासून काढून टाकाव्या लागत. दिंडा, अळू, रानतेरडा, करपिलाने घराला पुरते वेढून टाकलेले असायचे. चतुर्थी काही दिवसांवर आली की, घराच्या झाडलोटीला सुरुवात होई. सारे घर झाडून साफ करेपर्यंत घामटं निघे. आमच्या वाडीत बहुतेक घरे नळ्यांचीच. त्यामुळे नळ्यात काजळी साचायची. नाकातोंडात ही जळमटे जाऊ नयेत म्हणून डोक्याला आणि तोंडालाही कपडा गुंडाळावा लागे. लांबलचक वाडवणीच्या लुसलुशीत हिरांनी वाशांवरची कोळिष्टके खाली पाडावी लागत. केव्हा केव्हा तर नळ्यांतील कुसुरंडेही अंगावर पडत. यातला एखादा अंगाला लागला तर अंगाची काहिली व्हायची.

खरे काम असे ते रंगाचं. वाडीतली सारी पोरे मिळून आम्ही लाल माती (रेवा) आणण्यासाठी टेंबावर जायचो. हळदणकरांच्या घराच्या वरच्या बाजूच्या डोंगरात लालभडक मातीची खाण होती. कुदळीने खणून खणून डोंगर अर्धाअधिक खचला होता. मोठमोठाले दगड बाजूला करून माती भरून घरी आणावी लागे. ही ओली माती घरी घेऊन येईपर्यंत मानेचं बिरडं व्हायचं. पुढल्या दाराच्या कोनात माती ओतून ढीग करायचो.

घराला रंगरंगोटी केल्यावरच घराला शोभा येई. कडी तुटलेली एखादी बादली घ्यायची आणि त्यात हा रेवा पाणी घालून हाताने कालवायचा. लालभडक रंग आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायचा. मग एखादा पातळसा कपडा घेऊन बादलीत भिजवून रेव्याचा पहिला हात भिंतीवरून फिरे. जमिनीवर राहून हात पोहोचेपर्यंत रेवा काढताना भारी मजा यायची, पण वरचा रंग भाताच्या मुडीवर किंवा एखाद्या लाकडी सरीवर चढून काढावा लागे.

घराचे हे रंगकाम दोन-तीन दिवस चाले. दुसऱया दिवशी भिंतीवर वरंगळ न पडू देता हलकासा, पण जाड थराचा हात फिरवावा लागे. त्यामुळे भिंतीतली छिद्रे नाहीशी होत. संध्याकाळी भिंत सुकू लागली की, तिच्यावरचा मुलामा अधिक गडद होई. भिंतीतले बोवले म्हणजे आमच्यासाठी लॉटरीच असायची. कारण आक्काने लपवून ठेवलेल्या दुर्मीळ वस्तू अशाच वेळी आमच्या हाती लागायच्या. एरवी हे भिंतीतले खण म्हणजे वडीलधाऱयांची तिजोरीच असे. भिंती लख्ख झाल्या तरी जमिनीचे पापुद्रे खरवडून काढल्याशिवाय सारवण करायला मिळत नसे.

ओल्या सारवणावर घातलेली रांगोळी घराचं सौंदर्य अधिकच खुलवायची. ही रांगोळी म्हणजे तांदळाच्या पिठात घातलेले पाणी. हातांच्या मधल्या उलट्या तीन बोटांनी काढलेल्या कण्या हा कोकणच्या संस्कृतीचा खरा आविष्कार. देवाच्या पुढय़ात मी माझ्या नाजूक हातांनी स्वस्तिक काढायचो.. आक्काने हाती विणून लावलेले तोरण घराच्या शोभेत अधिकच भर घाली.

संध्याकाळी इधळ्याच्या खडकाजवळून गुरे घरी घेऊन येताना आणलेली फुलपत्री रात्री माटवीला बांधल्यावरच झोपायला मिळे. माटवी बांधण्यासाठी मात्र सर्वांचा हातभार लागे. शेरवडे, हरणे, कांगणे, कावंडाळ, रंगीबेरंगी तेरडा, सुपारीचे शिपट किवणीच्या दोरात ओवून आंब्याचा टाळ मधोमध बांधून गणपतीची माटी सजायची. कवंडा, सुपारीचे शिपट, कांगले चारी बाजूला आणि हरणे, तेरडा, शेरवडे गणपतीच्या डोक्यावर अशी साधारण बांधणी असे.

चतुर्थीचा दिवस उजाडे तो आनंद आणि उत्साह घेऊनच. घरात जेवणाची लगबग चाललेली असे. गणपती पूजेला लावीपर्यंत दुपार उलटून जाई. भटजींची पूजा झाल्यावर सामूहिक आरतीला सुरुवात व्हायची. घरातील आबालवृद्ध श्रद्धेने आणि भक्तिभावाने आपल्या लाडक्या गणरायाच्या आरतीत तल्लीन होत. वर्षभराच्या आतुरतेने ब्रह्मानंदी टाळी लागे. गणपतीला नैवेद्य दाखवल्यानंतर सारी मंडळी एकत्र जेवायला बसत.

दुपारची साऱयांची जेवणं आटपेपर्यंत संध्याकाळचे चार वाजत. मग एकामागोमाग कुकारे ऐकू येत. दिवेलागणीला साऱ्यांची गुरे घरी यायची. वाडीतल्या आरतीसाठी मांडावर सारे जमा होत. प्रत्येकाच्या घरच्या गणपतीची आरती आजही न चुकता होते. गावी आलेल्या चाकरमान्यांचे क्षेमकुशल होई. पूर्वजांनी मळलेली ही वाट आजही सुखेनैव चालू आहे.

आज खेडय़ांचे शहरीकरण झाले आहे. नळे-कौलांची घरे राहिली नाहीत. त्यांची जागा स्लॅब आणि मोठमोठय़ा इमारतीनी घेतली. रस्ते झाले, गावात गाडी आली, घरोघरी पाण्याचे नळ आले. विहिरीच्या रहाटाची घरघर ऐकू येईनाशी झाली. रेल्वे आली. त्यांची संख्या वाढली. पण कोकण रेल्वेचे आरक्षण नेहमीच फुल्ल झालेले असते. तरीही लोंबकळत का होईना, चाकरमानी कोकणातील आपल्या गावाकडे जातोच. घरच्या गणपतीची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. घरातील गणपतीवर आपल्या हाताने श्रद्धेचे फूल वाहिल्यावरच तो कृतकृत्य होतो. देश-विदेशात राहूनही निगुतीने आस्था बाळगणाऱया कोकणी माणसाचे गावाकडील आपल्या घराबद्दलचे प्रेम आजही अबाधित आहे. गणपतीच्या दिवसांमध्ये याची खरी प्रचीती येते.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)