महायुती सरकारमधील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील धुसफूस मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा बाहेर आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये खटके उडाले. ज्या लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारकडून गाजावाजा केला जात आहे त्या योजनेवरून सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपल्याचे समोर आले.
लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून मंत्रिमंडळ बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या जाहिरातीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतला. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई, दीपक केसरकर, दादा भुसे हे अजित पवार यांच्या मंत्र्यांवर आक्रमक झाले.
अजित पवार कसे श्रेय घेऊ शकतात? मुख्यमंत्र्यांचं नाव हटवून अजितदादांनी स्वतःचं नाव कसं दिलं? असा सवाल शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केला. खडाजंगी वाढत चालल्याने पाहून देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. अजित पवार गट आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये फडणवीस यांनी मध्यस्थी केली. यापुढे एकटा कोणी श्रेय घेणार नाही, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिली.