कर्नाटकातील बेंगळुरू येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका तरुणीने रिक्षाची राईड कॅन्सल केल्यामुळे रिक्षाचालकाने थेट तरुणीच्या कानशीलात लगावली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
ही घटना बुधवारी घडली. एका तरुणीने आणि तिच्या मैत्रिणीने ओला ॲपद्वारे दोन रिक्षा बुक केल्या. दरम्यान तिच्या मैत्रिणीने बुक केलेली रिक्षा आधी आल्याने तिने स्वत: बुक केलेली रिक्षा कॅन्सल केली. मात्र तोपर्यत तो रिक्षा चालक लोकेशनवर पोहोचला होता. मात्र तरुणीने रिक्षा कॅन्सल केल्याने चालकाला राग आला. आणि त्याने तरुणीचा पाठलाग करून तिला अरेरावी केली.
दरम्यान, तरुणीने परिस्थिती सांगूनही रिक्षा चालकाने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने तरुणीला अपशब्ध देखील वापरले. तुझा बाप देतो का गॅस? राईड कॅन्सलच का केली? असे रिक्षाचालक तरुणीला म्हणाला. याशिवाय त्याने तरुणीला अपमानास्पद शब्द देखील वापरले. पीडितेने घटनेचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली असता आरोपी रिक्षा चालकाने तिला धमकावले आणि तिचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने रागात येऊन तरुणीच्या कानशीलात लगावली. एवढं काही घडत असतानाही कोणीच मध्ये आले नाही. लोक फक्त व्हिडीओ काढण्यासाठी तिथे उभे होते. मात्र हा संपूर्ण प्रकार कॅमेरात रेकॉर्ड झाला आहे, असे त्या तरुणीने सांगितले.
राईड कॅन्सल केली म्हणून ओला ऑटो चालकाने तरुणीच्या कानाखाली मारली#viralvideo pic.twitter.com/jWZnvfPwUb
— Saamana (@SaamanaOnline) September 5, 2024
तरुणीने स्वत: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच आरोपीवर योग्य कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. तरुणीच्या पोस्टवर शहराच्या डीजीपींनी प्रतिक्रिया दिली आहे. महिलांना अशी वागणूक देणे लज्जास्पद आहे. यासारखे काही लोक ऑटोचालक समाजाला बदनाम करतात, असे ते म्हणाले. तसेच आरोपी चालकावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.