‘लाडका उद्योजक’… अदानींच्या फायद्यासाठी बँकांनी 62 हजार कोटींच्या कर्जाची 16 हजार कोटीत केली सेटलमेंट

हिंडेनबर्ग संस्थेच्या गेल्या महिन्यात आलेल्या अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी पुन्हा वादात सापडले. याप्रकरणावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी मोदी सरकारला धारेवर धरले. यानंतर आता अदानींचे नवीन प्रकरण समोर आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन’ने (एआयबीएए) जारी केलेल्या आकडेवारीवरून अदानी समूह आणि मोदी सरकार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योजकाला 46 हजार कोटींचा फायदा कसा झाला? याचा गौप्यस्फोट केला आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास एक ट्विट करत खळबळ उडवून दिली. ‘सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या 10 कंपन्यांचे 62 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे दावे निकाली काढायचे होते. मात्र अदानी समूहाकडे या बँकांची मालकी येताच बँकांनी अवघ्या 16 हजार कोटी रुपयांमध्ये सेटलमेंट केली. यामुळे अदानी समूहाला तब्बल 46 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला. सार्वजनिक बँकांनी या 10 कंपन्या अदानी समूहाने विकत घेतल्यानंतर जवळपास 46 ते 96 टक्के सवलत दिली, असा आरोप जयराम रमेश यांनी केला.

एआयबीएएने दिलेल्या तपशीलाचा फोटोही जयराम रमेश यांनी शेअर केला आहे. यात त्या 10 कंपन्यांची नावे आणि हजारो कोटींच्या कर्जाची किती कोटींमध्ये सेटलमेंट झाली याची माहिती दिलेली आहे.

अदानी समूहाने घेतलेल्या 10 कंपन्या

1. HDIL (Project BKC)
2. Radius Estates & Developers
3. National Rayon Corporation
4. Essar Power M.P. Ltd
5. Dighi Port Limited
6. Lanco Amarkantak Power
7. Coastal Enrgen Ltd
8. Aditya Estates
9. Karaikal Port
10. Korba West Power Company