chandrapur news – सहा तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद

चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या बिनबा गेट परिसरात एका व्यक्तीच्या घरी शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात सहा तासांनी यश आले आहे. घनदाट वस्तीत हा बिबट्या शिरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. चंद्रपूर शहरात बिबट्या घुसण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी सीमावर्ती भागात त्याचे अस्तित्व दिसून आले होते. एखाद्या शिकारीचा पाठलाग करत हा बिबट्या शहरात घुसला. यावेळी कुत्र्यांनी त्याच्यावर भुंकायला सुरूवात केली. कुंत्र्यांच्या भुंकण्यामुळे बिबट्या घाबरून एका घराच्या मागे असलेल्या झाडीत लपला. अशी शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

सकाळी सात वाजताच्या सुमारास तो काही युवकांच्या नजरेस पडल्यावर एकच खळबळ उडाली. याची माहिती लगेच वन विभागाला देण्यात आली. वन पथकाने तातडीने येऊन त्याला पकडण्याची तयारी केली. मात्र गर्द झाडीत तो लपून बसल्याने त्याला डार्ट मारण्यात फार अडचणी आल्या. शिवाय चारीबाजूने दाट वस्ती आणि लोकांची गर्दी बघता कुणालाही इजा होऊ नये, याची काळजी घेत रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. त्यामुळे तब्बल पाच तासांच्या अवधीनंतर त्याला बेशुद्ध करण्यात यश आले. या संपूर्ण अभियानात स्थानिक आमदार किशोर जोरगेवार पूर्णवेळ उपस्थित होते. त्यांनी वेळोवेळी वनाधिकाऱ्यांना सहकार्य आणि सूचना केल्या. दरम्यान, या बिबट्याला चंद्रपुरातील वन्यजीव उपचार केंद्रात हलवण्यात आले असून, ठणठणीत झाल्यावर त्याला निसर्गमुक्त करण्यात केले जाणार आहे.