रायगडात सायबर स्कॅमची दहशत; आठ कोटींचा ऑनलाइन गंडा

झटपट पैसे कमवण्यासाठी भामट्यांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यातच सायबर भामट्यांनीदेखील सगळीकडे हाहाकार माजवला आहे. विविध योजना किंवा स्कीम सांगून लाखोंचा गंडा घालणारी सायबर गँग सक्रिय झाली आहे. रायगडात या सायबर चोरट्यांनी आठ महिन्यांत तब्बल 14 जणांची फसवणूक करून आठ कोटींचा ऑनलाइन गंडा घातला आहे. त्यामुळे रायगडात सायबर स्कॅमची चांगलीच दहशत पसरली आहे.

बँकेतून किंवा सीबीआयमधून बोलतोय.. वीज बिल थकलंय.. बेकायदा वस्तू, सिमकार्ड मिळाले… शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट किंवा त्याहून अधिक नफा मिळवून देतो.. असे विविध फंडे अजमावत सायबर भामट्यांनी नागरिकांना लाखोंचा गंडा घातल्याचे अनेक प्रकार उघडकीस येतात. रायगडमध्येदेखील या सायबर भामट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या चोरट्यांनी उच्चभ्रू सोसायटीत राहणारे तसेच निवृत्त व ज्येष्ठ नागरिकांना ब्लॅकमेल करून व भीती दाखवून गंडवले आहे. गेल्या आठ महिन्यांत 14 जणांनी आपली आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे.

वृद्धाला लुटले डोंबिवली : फेडेक्स कंपनीतून
बोलतोय.. तुमच्या नावाने पार्सल आले आहे. त्यात पाच पासपोर्ट, तीन क्रेडिट कार्ड, 120 ग्रॅम मेफेड्रोन पावडर सापडले आहे. त्याची पोलिसात तक्रार देतो अशी भीती दाखवून वृद्धाला 11 लाख 50 हजारांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. सुधीर गर्गे (62) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी गर्ने यांनी डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तीन गुन्ह्यांची उकल करण्यात यश
रायगडच्या सायबर गुन्हे शाखेने या घटनांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या आहेत. पोलिसांनी आतापर्यंत तीन गुन्ह्यांची उकल केली असून तक्रारदारांचे 5 लाख 40 हजार रुपये परत मिळवून दिले आहेत, तर उर्वरित पैसे परत मिळवण्यासाठी सायबर भामट्यांच्या बँकांचे खाते फ्रीज केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आमिषाला बळी पडू नका, घाबरू नका आणि अशा घटना घडल्यास त्वरित पोलिसात तक्रार करा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.