आसाममध्ये मोठा स्टॉक मार्केट घोटाळा उघडकीस आला आहे. गुंतवणूकदारांची तब्बल 2 हजार 200 कोटींची फसवणूक झाली आहे. 22 वर्षीय बिशाल फूकनने मोठ्या रकमेच्या परतव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घातला. पोलिसांनी कारवाई करत हा घोटाळा उघडकीस आणला.
आसाममध्ये आरबीआय व सेबीच्या नियमांचे पालन न करताच काही कंपन्या ऑनलाईन ट्रेडिंगचा व्यवसाय करतात असा अहवाल काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले. पोलिसांनी डिब्रुगड येथून फुलकनला तर गुवाहाटीतून स्वप्नील दासला अटक केली.
फुलकनच्या घरावरही पोलिसांनी छापा मारला. त्याच्या घरातून घोटाळ्याचे काही कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागले आहेत. याप्रकरणात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई येत्या काही दिवसांत अजून तीव्र केली जाईल. बोगस ब्रोकर विरोधात गुन्हा नोंदवला जाईल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले.
दोन महिन्यांत 30 टक्के परतावा
आरोपी फूकलन हा ऑनलाईन ट्रेडर आहे. त्याचे राहणीमान आलिशान होते. त्याने चार कंपन्या स्थापन केल्या होत्या. 60 दिवसांत 30 टक्के परताव्याची हमी तो गुंतवणूकदारांना द्यायचा. याद्वारे त्याने आसाम व अरुणाचल प्रदेशमधील गुंतवणूकदारांची फसवणूक केली. त्याने आसामी सिनेसृष्टीत गुंतवणूक केली. मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केली, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आसामी नृत्य दिग्दर्शक सुमी बोरह याचाही पोलीस शोध घेत आहेत. तो फूकलनच्या संपर्कात होता, असा पोलिसांचा दावा आहे.
सावध राहा – मुख्यमंत्र्यांचे आवाहन
नियमानुसार गुंतवणूक न करणाऱ्या ब्रोकरपासून सावध राहा, असे आवाहन आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी नागरिकांना केले आहे. अतिरिक्त व्याज देऊन पैसे दुप्पट करण्याची हमी ही निव्वळ फसवणूक आहे. अशा प्रकारे कोणताच ब्रोकर गुंतवणूक करत नाही. गुंतवणुकीचे काही नियम आहेत. गुंतवणुकीसाठी डिमॅट अकाऊंट उघडणे आवश्यक असते. फसवणूक करणाऱ्या अॅपला नागरिकांनी बळी पडू नये. अशा गुंतवणुकीतून सुरुवातीला चांगला परतावा मिळतो. नंतर लूट सुरू होते, असेही मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले.