जम्मू–कश्मीरला राज्याचा दर्जा देणारच

केंद्रशासित प्रदेशांना राज्याचा दर्जा दिला जातो पण, एखाद्या राज्याचाच दर्जा काढून घेणे हे प्रथमच घडले असून, निवडणुकांनंतर जम्मू-कश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा दिला गेला नाही तर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर प्राधान्याने हा दर्जा दिला जाईल, असे आश्वासन देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज येथे प्रचाराचा नारळ फोडला.

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देणे ही केवळ काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. भाजप-संघ काहीही म्हणोत, आम्ही जम्मू-काश्मीरच्या जनतेला त्यांचा राज्याचा दर्जा परत देणार आहोत, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीच्या कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी मानसिकदृष्ट्या पराभूत झाले आहेत, त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

मोदी म्हणाले होते की त्यांचा पक्ष पराभूत होऊ शकत नाही आणि त्यांचा देवाशी थेट संबंध आहे. पण, निवडणुकीत देवाने त्यांना थेट संदेश दिला की, तो जनतेशी बोलतो आणि त्यांच्या इच्छेनुसार वागतो, असा टोलाही राहुल यांनी लगावला.