दुलीप ट्रॉफीतही इशानबाबत साशंकता

गेल्या वर्षी हिंदुस्थानचा नंबर वन यष्टिरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज असलेल्या इशान किशनचे हिंदुस्थानी संघातील भवितव्य हळूहळू अंधःकारमय होऊ लागलेय. गेल्या वर्षी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे इशानला राष्ट्रीय संघातील स्थान आणि केंद्रिय करारातून वगळण्याच्या जबर शिक्षेला सामोरे जावे लागले होते. त्याची राष्ट्रीय संघात परतण्याची इच्छा असली तरी त्याचे प्रयत्न कमी पडताहेत. बुचीबाबू स्पर्धेत तो खेळला असला तरी दुलीप ट्रॉफीत त्याच्या खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात असल्यामुळे त्याचे राष्ट्रीय संघातील पुनरागमन लांबणीवर पडले आहे.

राष्ट्रीय संघात पुनरागमन कठीण

खरं तर, इशान किशनने मानसिक तणावामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. यानंतर ‘बीसीसीआय’च्या संघनिवड समितीने टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी इशानला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला, मात्र इशानने त्याकडे दुर्लक्ष केले. तो शेवटची रणजी ट्रॉफी स्पर्धाही खेळला नव्हता. त्यामुळे त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय करारातूनही वगळण्यात आले. आता देशांतर्गत क्रिकेट खेळल्यामुळे इशानच्या टीम इंडियात पुनरागमनाच्या आशा उंचावल्या होत्या, मात्र त्याला पुन्हा एकदा झटका बसताना दिसत आहे.

इशान किशन जायबंदी?

इशान किशनचे दुलीप ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणे कठीण मानले जात आहे. एका क्रिकेट पोर्टलने दिलेल्या रिपोर्टनुसार, इशान किशन जायबंदी झालाय. बुचीबाबू स्पर्धेत इशान किशन हा झारखंड संघाचा कर्णधार होता, मात्र त्याचा संघ या स्पर्धेत लीग टप्प्यातच बाहेर पडला होता. आता किशन दुलीप ट्रॉफीमध्ये खेळू शकणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. दुलीप ट्रॉफीमध्ये इशानच्या जागेवर संजू सॅमसनचा समावेश केला जाऊ शकतो, असा दावा अहवालात केला जात आहे. जेव्हा दुलीप ट्रॉफीसाठी संघांची घोषणा करण्यात आली तेव्हा संजू सॅमसन कोणत्याही संघात नव्हता.