सर्वसामान्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या ‘आपलं सरकार’ या पोर्टलवर सर्वसामान्यांनी दाखल केलेल्या तक्रारी प्रलंबित असल्याचे एकीकडे उघड झाले आहे. दुसरीकडे केंद्र सरकारच्या ‘सीपीजीआरएएमएस’ अर्थात ‘सेंट्रलाईज पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेस अॅण्ड मॉनिटरिंग सिस्टम’वर दाखल झालेल्या राज्याशी संबंधित तक्रारींनाही आपल सरकार पोर्टलने दाद दिली नसल्याचे उघड झाले आहे. सर्वसामान्यांच्या तक्रारी सोडवण्यात विविध विभाग उदासीन असून त्यात महसूल व वन विभाग आणि कृषी विभाग आघाडीवर आहे.
सर्वसामान्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी केंद्र सरकारने ‘सीपीजीआरएएमएस’ अर्थात ‘सेंट्रलाईज पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेस अॅण्ड मॉनिटरिंग सिस्टम’ हे पोर्टल सुरू केले. पुढे राज्यात महायुती सरकार आल्यावर राज्य सरकारने आपले सरकार 2.0 व केंद्र सरकारच्या ‘सीपीजीआरएएमएस’ पोर्टलचे विलीनीकरण करण्यात आले. यामध्ये नागरिकांनी राज्य शासनाकडे दाखल केलेल्या थेट तक्रारींसह त्यांनी केंद्र सरकारकडे राज्याशी संबंधित दाखल केलेल्या तक्रारींचे स्वतंत्ररीत्या विविध विभागांकडून निराकरण केले जाते.
केंद्र व राज्य सरकारच्या दोन्ही पोर्टलचे एकत्रीकरण करून बारा महिने झाले, पण तरीही केंद्र सरकारच्या पोर्टलवर दाखल झालेल्या राज्याशी संबंधित सुमारे 2 हजार 113 तक्रारी प्रलंबित राहिल्याचे उघड झाले आहे.
महसूल व वन विभागात सर्वाधिक म्हणजे 532 तक्रारी प्रलंबित आहे. त्याशिवाय कृषी विभागात 211 तक्रारी, आयटी विभागात 93 तक्रारी, ग्रामविकास विभागात 154, पर्यटन व सांस्कृतिक विभागात 96 तक्रारी यासह इतर विविध विभागांकडील 2 हजार 113 तक्रारी प्रलंबित आहेत.