नितीन गडकरींचा मिंधे सरकारला घरचा आहेर, पुतळा स्टेनलेस स्टीलचा असता तर कोसळला नसता

सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेनलेस स्टीलचा असता तर कोसळला नसता, असे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मिंधे सरकारला चांगलाच घरचा अहेर दिला आहे.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सर्व स्तरातून मिंधे सरकारवर टीका झाली. बेफाम वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला, असा दावा मिंधे सरकारने केला. या दाव्याला केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिल्ली येथील कार्यक्रमात बोलताना सणसणीत चपराक दिली आहे. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, समुद्रकिनारी रस्ते व उड्डाणपूल बांधताना मी स्टेनलेस स्टीलचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रयोग सुरू केला आहे.

समुद्रकिनाऱ्याजवळ असल्याने स्टेनलेस स्टीलचा आग्रह

मुंबईत असताना 55 उड्डाणपूल बांधले गेले. त्या वेळी उड्डाणपुलांची पाहणी करण्यासाठी मला बोलावण्यात आले. पुलाच्या बांधकामात वापरण्यात येणाऱ्या लोखंडी सळ्यांना पावडर कोटिंग करण्यात आले होते. ही बाब मी संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली. पावडर लावल्याने सळ्यांना गंज लागत नसल्याचे मला सांगण्यात आले. मात्र तरीही सळ्यांना गंज लागला होता. त्यामुळे मी समुद्रकिनाऱ्यापासून 30 कि.मी. अंतरावर होत असलेल्या बांधकामात स्टेनलेस स्टील वापरण्याचा आग्रह करतो, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले.

गडकरींचा सल्ला अभ्यासपूर्ण – शरद पवार

गडकरी हे कामाचा बारकाईने अभ्यास करतात. कामाचा दर्जा उत्तम राहील याची ते काळजी घेतात. देशामधील अनेक रस्ते त्यांनी चांगल्या पद्धतीने बांधले आहेत. आम्ही संसदेत त्यांच्या कामाचे मोकळेपणाने कौतुक केले आहे. गडकरी यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाबाबत काही मत व्यक्त केले असेल तर त्याचा नक्कीच अभ्यास त्यांनी केला असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

मुंबईची परिस्थिती पहा!

गडकरी यांनी मुंबईच्या समुद्रकिनारा परिसरातील इमारतींचेही उदाहरण दिले. आता तुम्ही मुंबईतील परिस्थिती पाहा. कितीही चांगले काम करा. समुद्रापासून जवळच्या परिसरात ज्या इमारती आहेत, त्यांना लवकर गंज लागतो. त्यामुळे समुद्रापासून 30 किलोमीटरच्या आत बांधकाम करताना तिथे स्टेनलेस स्टीलचाच वापर व्हायला हवा, असे माझे मत आहे, असे नितीन गडकरी यांनी नमूद केले. किनाऱ्याजवळील बांधकामांमध्ये गंज-प्रतिरोधक उत्पादने वापरणे अत्यंत आवश्यक आहे, असे ते म्हणाले.