देशाला अभिमान वाटेल असेच काम करीत राहणार! हणमंतराव गायकवाड यांना ‘साताराभूषण’ पुरस्कार प्रदान

‘काही मित्रांच्या सहकार्याने सुरू केलेल्या ‘भारत विकास ग्रुप’ या संस्थेचे काम वृद्धिंगत होताना जिल्ह्यामध्ये आज नऊ हजार लोकांना रोजगार मिळाला. आपल्याला जे शिक्षण हवे ते शिकविले जात नाही, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. आज 100 जॉब्स प्रोफाइल तयार आहेत. 16 देश आपल्या देशाकडून कर्मचाऱ्याची अपेक्षा करीत आहेत आणि हे काम ‘भारत विकास ग्रुप’कडून करण्याचे काम सुरू आहे. आज जिल्ह्याला नव्हे, तर देशाला अभिमान वाटावा असेच काम करीत राहणार,’ अशी ग्वाही भारत विकास ग्रुप(बीव्हीजी)चे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांनी दिली.

सातारा येथील गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘साताराभूषण’ पुरस्कार ‘बीव्हीजी ग्रुप’चे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री देसाई, ‘रयत’चे प्रमुख संघटक डॉ. अनिल पाटील, ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे, अशोक गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले यांची उपस्थिती होती.

देसाई म्हणाले, ‘ट्रस्टच्या माध्यमातून हनमंतराव गायकवाड यांची पुरस्कारासाठी केलेली निवड ही आदर्श आणि कौतुकास्पद आहे. गावपातळीवर विशेष कार्य करणारा सामान्य असून, असामान्य अशा व्यक्तींना हे पुरस्कार देण्याचे काम गोडबोले परिवार करीत आहे.’

हणमंतराव गायकवाड म्हणाले, ‘आठ मित्रांच्या सहकार्याने 22 मे 1997ला ‘भारत विकास ग्रुप’ची स्थापना करून तीन वर्षांत त्यातून 200 लोक कामासाठी नेमले. आज देशातील राष्ट्रपती निवास, संसद, पंतप्रधान कार्यालय, तसेच देशातील 22 एअरपोर्ट्सचा मेंटेनन्स असे करीत अनेक मान्यवर धार्मिक स्थळे, आणि परदेशातही काम करीत 108 क्रमांकाच्या ऍम्ब्युलन्सची स्थापना केली.’

अमेरिका, सौदी अरेबिया येथे काम करताना आता शेती उत्पादन कसे वाढेल, यासाठी प्रयत्न करीत आहे. कॅन्सरवर औषध शोधत मोतीबिंदू, फॅटी लिव्हर आणि हृदयावरील औषधे बनविण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अच्युत गोडबोले यांनी प्रास्ताविक केले. प्रद्युम्न गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. चैतन्य गोडबोले यांनी आभार मानले. यावेळी हणमंतराव गायकवाड यांच्या मातोश्री सीतादेवी गायकवाड, पत्नी वैशाली गायकवाड, भाऊ दत्तात्रय गायकवाड, तसेच स्वप्नाली गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.