मानसिक छळाला कंटाळून अॅटलस सायकल कंपनीच्या माजी अध्यक्षाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सलील कपूर असे मयत माजी अध्यक्षाचे नाव असून स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलमधून त्यांनी मंगळवारी दुपारी स्वतःवर गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. कपूर यांच्या घरी पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून यात चार ते पाच लोकांवर मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दिल्लीतील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम लेन येथील राहत्या घरी देवघराजवळ त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. यानंतर ही घटना उघडकीस आली. कपूर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. पत्नी आणि मुलं कपूर यांच्यापासून विभक्त राहतात. कपूर यांची पत्नी सध्या दुबईत वास्तव्यास आहे.
दरम्यान, घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक अडचण आणि चार लोकांनी मानसिक, शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू असून सुसाईडमध्ये उल्लेख असलेल्या लोकांची नावे सांगण्यास नकार दिला.
सलील कपूर यांची वहिनी नताशा कपूर हिनेही जानेवारी 2020 मध्ये याच घरात आत्महत्या केली होती. सलील कपूर यांना 2015 मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 9 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या दोन प्रकरणांमध्ये अटक केली होती. शिवाय 2014 मध्ये दक्षिण दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी पोलीस ठाण्यात दोन विविध प्रकरणांमध्ये कपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.