Sindhudurg News – दुचाकी आणि एसटी बसमध्ये धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी

विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला दुचाकी धडकल्याने अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना देवगडमध्ये घडली. विश्वनाथ हरी कोंडस्कर असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघाताचे वृत्त समजताच देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील, देवगड आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर, कनिष्ठ सहाय्यक योगेश पांचाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली.

विजयदुर्ग आगाराची मिठबाव-देवगड-विजयदुर्ग एसटी बस बुधवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास देवगडकडे येत होती. याचदरम्यान खाक्षी येथील अरुंद धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराची एसटीच्या उजव्या बाजूला धडक बसली. यात दुचाकीस्वार विश्वनाथ कोंडस्कर हे बाजूला फेकले गेले तर दुचाकी थेट एसटीखाली गेली.

कोंडस्कर हे बाजूला फेकले गेल्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच डोक्याला मार बसला. मात्र एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. जखमी दुचाकीस्वाराला तात्काळ देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. दरम्यान, दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांनी तक्रार नसल्याचे एसटी प्रशासन आणि पोलीस प्रशासनास लेखी दिल्याने याप्रकरणी कोणतीही नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली नाही.