महाविकास आघाडीमध्ये कुठेही एकमेकांसाठी लढाई नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि स्वाभिमानासाठी आम्ही लढतोय. महाराष्ट्रद्वेष्ट्या भाजपला महाराष्ट्रातून पळवणे हेच आमचे ध्येय आहे. हे मुंबई विकायला निघालेले असून 256 एकर मिठागराचा भूखंड अदानीला देण्यात येत आहे. त्यामुळे आमचे पहिले ध्येय भाजपला पळवणे हेच आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले.
मराठवाडा दौऱ्यावर असताना माध्यमांनी त्यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असा सवाल केला असता आदित्य ठाकरे म्हणाले की, अंतर्गत चर्चेतून याचा निर्णय होईल. कुणीही मुख्यमंत्रीपदासाठी लढत नाहीय. महाराष्ट्रद्वेष्ट्या भाजपला हद्दपार करण्यासाठी आम्हाला सरकार बनवायचे आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी जागावाटपावरही भाष्य केले.
जागावाटपावर आम्ही चर्चा करू. जागावाटपावेळीही रस्सीखेच होणार आहे. त्यामुळे आघाडीत तुटतेय असे वाटू देऊ नका. कारण रस्सीखेच ही झालीच पाहिजे. अन्यथा तिथे कुणाची किती ताकद आहे हे समजणार नाही. त्यामुळे प्रत्येक जागा प्रत्येकाने मागितली पाहिजे, त्यानुसार आम्ही एकमेकांची मदत करू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांना भरीव मदत करणे गरजेचे
मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली असून वादळी पावसामुळे नुकसान झालेले आहे. सणवार सुरू असल्याने सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगली भरीव मदत करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे सध्या गरजेचे आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच पंचनामे होत राहतात, मात्र 5 रुपये, 50 रुपये असे चेक दिल्याचे दिसू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सणवार आहे, शेतकऱ्यांना मदत देणं गरजेचं आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी लोकांना त्रास होऊ नये ह्यासाठी संपावर तोडगा काढावा.
– युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे @AUThackeray pic.twitter.com/9Vyw7PSZqV
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 4, 2024
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी संपावर तोडगा काढावा
एसटीच्या संपावरही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी लोकांना त्रास होऊ नये यासाठी संपावर तोडगा काढावा. कर्मचाऱ्यांना मागण्यांवर मध्यमार्ग काढावा. महाविकास आघाडीचे सरकार असताना रस्त्यावर आलेले, आग लावणारे, चाव्या देणारे भाजप नेते कुठे आहेत, असा सवाल करत त्यांनी यावर बोलावे, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.