Assembly election – विनेश फोगाट, बजरंग पुनिया निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, काँग्रेसकडून तिकीट मिळणार?

हरयाणामध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून 5 ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे. यासाठी सर्व पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे. भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी काँग्रेसनेही विशेष रणनिती आखली असून खास चेहऱ्यांना तिकीट देण्याचा विचार सुरू आहे.

देश-विदेशात कुस्तीत हिंदुस्थानचा झेंडा फडकावणाऱ्या विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. नुकतीच त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. यामुळे विनेश आणि बजरंग निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता बळावली आहे.

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांना कोणत्या मतदारसंघातून तिकीट देता येईल यासाठी काँग्रेसने सर्व्हेक्षणही केले आहे. राहुल गांधी यांनाही बजरंग पुनिया यांनी निवडणूक लढवावी असे वाटते. बजरंग हे बादली मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छितात. मात्र येथे काँग्रेसचे कुलदीप वत्स हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे पक्षापुढे नवा पेच निर्माण झाला असून विद्यमान आमदाराला नाकारून बजरंग पुनियाला तिकीट दिले जाते की त्यांच्यासाठी वेगळा मतदारसंघ शोधला जातो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

बजरंग पुनिया प्रमाणे विनेश फोगाटही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज आहे. याआधी तिने निवडणूक लढवण्यास नकार दिला होता, मात्र आता ती निवडणुकीसाठी तयार असल्याचे दिसत असून काँग्रेस तिला बारडा मतदारसंघातून तिकीट देऊ शकते. काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनीही याला सहमती दिली आहे.

दरम्यान, 2023 पासून कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. डब्ल्यूएफआयचे तत्कालिन अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी आरोप केले. यामुळे भाजप विरोधात वातावरण असून याचाच फायदा उठत विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाला काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. सोमवारी काँग्रेस कमिटीच्या बैठकीनंतर दीपक बाबरिया यांनी याबाबत 1-2 दिवसात निर्णय घेतला जाईल असे म्हटले.