सराफांना कोट्यवधींचा गंडा घालून कारागीर फरार; आटपाडी, सांगोला, सांगलीतील सराफांचे सोने लंपास

आटपाडीसह सांगली, सोलापूर जिह्यातील सराफांकडून दागिने तयार करण्यासाठी घेतलेले कोट्यवधींचे सोने घेऊन दोन बंगाली कारागीर फरार झाले आहेत. या घटनेमुळे सराफ व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. तब्बल 2 कोटी 41 लाख 59 हजार रुपयांचे 3.5 किलो सोने घेऊन पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तक्रार झाल्यानंतरही पोलिसांना या दोन्ही कारागिरांचा  शोध लागलेला नाही. पोलीस पथके त्यांच्या मागावर असल्याचे सांगण्यात येत आहे.

गौतम गोपाल दास आणि सौरभ गोपाल दास (सध्या रा. आटपाडी. मूळ रा. गोपालपूर दक्षिणपाडा पूर्व मेदनापूर, कोलकाता) अशी फरार झालेल्या कारागिरांची नावे आहेत.

कोलकाता येथील गौतम दास आणि त्याचे सहकारी सुवर्ण कारागीर आटपाडी शहरातील सराफ व्यापाऱ्यांकडून सोने आणि चांदी घेऊन दागिने तयार करून देण्याचा व्यवसाय करतात. गेल्या 25 वर्षांपासून गौतम दास आटपाडी शहरात सोने घेऊन दागिने करून द्यायचा. सांगली आणि सोलापूर जिह्यातील आणि प्रामुख्याने आटपाडी शहरातील बहुतांश व्यापारी त्याचे ग्राहक होते. आज गौतम दास गायब झाल्याची माहिती मिळताच आटपाडी शहरात खळबळ उडाली. शहरातील सराफ पेठेत सन्नाटा पसरला होता. सोने गायब झालेल्या सराफांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी दाखल केल्या.

आटपाडी येथील प्रसाद भारत जवळे यांच्याकडून सोन्याची 750 ग्रॅम लगड दागिने बनविण्यासाठी, 450 ग्रॅम वजनाचे जुने सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी आणि हॉलमार्ंकगसाठी 2296 ग्रॅम नवीन सोन्याचे दागिने असे 2 कोटी 41 लाख 59 हजार रुपये किमतीचे हॉलमार्क करण्याकरिता घेतले होते.

हॉलमार्किंग सांगलीतील कुबेर हॉलमार्किंग सेंटरमधून करून आज देतो, असे त्याने सांगितले होते. आज त्याला फोन केला असता तो बंद लागला. आटपाडीत राहतो तेथे बघितले असता तो दिसला नाही. त्याच्या सहकाऱ्यांनी गौतम आला नाही आणि सौरभ सांगलीला गेल्याचे सांगितले. त्याचा मोबाईलही बंद होता. त्यामुळे गौतम दास व सौरभ दास यांनी 2 कोटी 41 लाख 59 हजार रुपयांचे 3.5 किलो सोने घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आटपाडी शहरातील संदीप नानासाहेब जाधव, सचिन शिवाजी काटकर, नानासो तुळशीराम बोधगिरे, प्रमोद मारुती भोसले, सुरेश पंढरीनाथ चव्हाण, शंकर रघुनाथ चव्हाण, बाळासाहेब रामचंद्र गिड्डे, मोहन रामचंद्र गिड्डे, शशिकांत सावंता जाधव, राहुल बाळासाहेब व्हनमाने या सराफांचेदेखील दागिने बनविण्यासाठी घेतलेले सोने परत न देता गौतम दास व सौरभ दास यांनी फसवणूक केली आहे.

तक्रारीपेक्षा अधिक सोने गायब

आटपाडी शहरात सोन्या-चांदीची दुकाने मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यापैकी अनेक सराफांनी मोठय़ा प्रमाणात दागिने करण्यासाठी सोने दिले होते. रितसर सोने देणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे दाखल झालेल्या तक्रारींपेक्षा अधिक सोने लंपास झाले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.