
मिंधे सत्तेत आल्यापासून एकामागोमाग एक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटत आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेले अनेक मोठे प्रकल्प गुजरातसह इतर राज्यांमध्ये गेले. दुसरीकडे केंद्र सरकारही गुजरातला प्रकल्पांची खैरात देत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली असून मिंधे-भाजप सरकारवर टीका केली.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, केंद्र सरकारने गुजरातमधील सानंदमध्ये Kaynes Semicon च्या 3300 कोटींच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला मान्यता दिली. यापूर्वी सानंद मध्ये CG power च्या 7500 कोटीच्या तर ढोलेरामध्ये 91000 कोटीच्या #TATA च्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला मान्यता दिली. विशेष म्हणजे या प्रकल्पांना केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात सबसिडी देतं.
सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला आणि त्यातून निर्माण होणारे रोजगारही गुजरातला. केंद्र सरकार सबसिडी देत असलेल्या सेमीकंडक्टर प्रकल्पांपैकी एकही प्रकल्प महाराष्ट्राला नाही. गुजरातचे नेते महाराष्ट्राच्या युवांच्या हक्काचे रोजगार पळवून महाराष्ट्राची लूट करत असताना, महाराष्ट्राचे राज्यकर्ते गप्प का? लाडक्या खुर्चीच्या उपकाराच्या परतफेडीसाठी तर महाराष्ट्राच्या लुटीस राज्यसरकारची मुकसमंती नाही ना? असा बोचरा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
काय आहे प्रकल्प?
केनेस सेमिकॉन कंपनीने गुजरातमधील साणंद येथे 3,307 कोटी रुपयांचे सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्यासाठी दिलेल्या प्रस्तावाला मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला मिळाला आहे. दिवसाला 6.3 दशलक्ष चिप्स तयार करण्याची या प्रकल्पाची क्षमता असेल. सेमीकंडक्टरचे केंद्र बनण्याच्या दिशेने हिंदुस्थानच्या प्रयत्नांना आणखी एक चालना मिळेल. याचाच उल्लेख रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.