पोलीस भरती आधीच तरुणाचा जीव गेला, लहान भावाने सांगितला संपूर्ण प्रसंग

झारखंडमध्ये पोलीस भरतीसाठी शारिरीक चाचणी घेतली जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात चाचण्या घेतल्या जात आहेत. पोलीस भरतीदरम्यान शारिरीक चाचणीवेळी 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. यात बिहारच्या दोन भावांपैकी एकाचा जीव गेला. मोठ्या भावाच्या मृत्यूने लहान भावाला धक्का बसला आणि त्याने संपूर्ण प्रसंग सांगितला.

बिहारच्या जमुई जिल्ह्याच्या गंगरा गावचे दोन भाऊ 27 ऑगस्ट रोजी झारखंडच्या गिरीडीहमध्ये उत्पादन शुल्क विभागात  पोलीस (हवालदारपद ) भरतीसाठी भाग घ्यायला गेले होते. 28 ऑगस्ट रोजी धावण्याची चाचणी होती. चाचणीची वेळ पहाटे 5 ची होती. भरतीसाठी आलेल्या सर्वांना पहाटे 5 वाजल्यापासूनच रांगेत उभे केले होते. मात्र साधारण 11 च्या सुमारास शर्यंतीला सुरुवात झाली. भीषण उकाड्यामुळे गंगरा गावातील गोविंद कुमार आणि अनेकजण चाचणीदरम्यान बेशुद्ध झाले.

उकाडा जास्त असल्यामुळे लहान भाऊ निर्मित याला दोनदा चक्कर आल्यानंतर त्याने मैदान सोडले. मात्र मोठा भाऊ गोविंद हा नोकरी मिळविण्याच्या जिद्दीने धावत राहिला. छोटा भाऊ निर्मित चाचणीतून बाहेर पडत भावाची वाट पाहत होता. दरम्यान त्यावेळी कळले की जवळपास दोन डझन विद्यार्थी चक्कर येऊन खाली पडले. तर गोविंद याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला आधी प्राथमिक उपचारसाठी गगिरडियेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती बिघडल्याने त्याला रात्री धनबादला पुढील उपचारासाठी नेण्यात आले.

धनबादमध्येही गोविंद याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला रांचीच्या रिम्सला न्यायला सांगितले. मात्र रिम्सला दोन तास वाट पाहूनही गोविंद याला दाखल करून घेतले नाही आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. घरातला मुलगा गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. गोविंद गंगरा पंचायतमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करायचा.

‘आजतक’ या वृत्तवाहिनीशी बोलताना गोविंदचे वडील खूपच भावूक झाले. शासनाच्या दुर्लक्षामुळे गोविंदचा मृत्यू झाल्याचे गोविंदचे वडील आणि लहान भाऊ निर्मिती म्हणाले. त्यामुळे गोविंदच्या मृत्युची जबाबदारी सरकारने घ्यावी. यासाठी सरकारने नुकसानभरपाईसोबतच कुटुंबातील एका सदस्याला नोकरीही द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.