>> योगेश जोशी
सण उत्सवांचा महिना असलेला श्रावण आता संपला आहे. श्रावण संपल्यावर भाद्रपद महिन्यात वेध लागतात ते बाप्पाचे. आबालवृद्धांना प्रिय असणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी भाद्रपद महिन्यात येणारे पहिले वर्त म्हणजे हरतालिका….हरितालिका म्हणजे काय आणि हे कधी कसे करायचे याबाबत जाणून घेऊ या.
हरितालिकेचे व्रत भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीयेला केले जाते. नावावरून हे व्रत शिवपार्वतीशी संबंधित असल्याचे लगेच समजते. या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. हरितालिका आपल्या संस्कृतीत महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले धार्मिक व्रत आहे. ‘हरिता’ म्हणजे ‘जिला नेले ती’ आणि ‘लिका’ म्हणजे ‘सखी’. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी तिची सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून या व्रताला ‘हरितालिका’ असे नाव पडल्याची आख्यायिका आहे. हरितालिकेची कथा आणि व्रताबाबतची माहिती भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे.
हरितालिकेच्या निमित्ताने शिव म्हणजे पुरुषतत्व आणि पार्वती म्हणजे स्त्रीतत्व यांची पूजा करण्यात येते. पार्वतीने शंकराच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली. तसेच हे वर्त केले. त्यामुळे कुमारिका चांगल्या पतीप्राप्तीसाठी हे व्रत करतात. तसेच विवाहित महिला पतीच्या दिर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. हे व्रत करताना वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात. तसेच काहीजण हरितालिका, सखी आणि पार्वती यांची मुर्ती आणतात. काही ठिकाणी पार्वती आणि तिच्या सखीच्या मूर्तीची पूजा करण्यात येते.
पुजेच्या सुरवातील व्रताचा संकल्प करून सोडषोपचारे पुजा करण्यात येते. त्यानंतर शिवपार्वती पूजन,सौभाग्यलेणी अर्पण, नैवेद्य,आरती व कथावाचन असे या पूजेची पद्धती असते. दिवसा पूजा झाल्यानंतर रात्री जागरण करून खेळ खेळतात आणि देवीची आराधना करण्यात येते. काही ठिकाणी या दिवशी करण्यात येणाऱ्या जागरणाला जगराता म्हणतात. दुसऱ्या दिवशी मांडलेल्या पूजेचे उद्यापन करून महिला उपवास सोडतात.
हरितालिका हे व्रत देशभरात विविध प्रकारे केले जाते. पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. महाराष्ट्रामध्ये कुमारिका आणि विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. उत्तर भारतात हरितालिका तीज म्हणून हे व्रत केले जाते. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान या प्रांतातही हे व्रत महिला करतात.