
गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ अंतराळात अडकलेली हिंदुस्थानी वंशाची सुनिता विल्यम्स आणि तिचे सहकारी बुच विल्मोर यांनी बोईंग स्टारलायनर स्पेसक्राप्टमध्ये एक नवीन समस्या आल्याचे सांगितले आहे. विल्मोर यांनी दावा केला आहे की, त्यांनी या स्पेसक्राप्टमध्ये एक विचित्र प्रकारचा आवाज ऐकला आहे.
मिशिगनच्या मीट्रियोलॉजिस्ट रॉब डेल यांनी विल्मोर आणि मिशन कंट्रोलमध्ये झालेला संवाद सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान विल्मोर आपला फोन स्पीकरच्या दिशेने करतात, कारण मिशन कंट्रोलचा आवाज स्पष्ट ऐकू येईल. पहिल्यांदा स्पष्ट ऐकू न आल्याने ते पुन्हा प्रयत्न करताना दिसत आहेत.
मिशन कंट्रोलच्या माहितीनुसार, हा आवाज असा आहे, जसे कोणीतरी संदेश पाठवत आहे. प्राथमिक तपासात कळले की, हा आवाज स्पेसक्राफ्टमधील स्पीकरमधून येत होता. सध्या मिशन कंट्रोलने बुच विल्मोर यांना आश्वस्त केले की, तो आवाज अॅनेलिसिस करून लवकरच त्याबाबत माहिती देऊ. बोईंग स्टारलायनर स्पेस्क्राफ्टमधील बिघाडामुळे ते क्रू शिवाय परत आणले जात आहे. सध्या अंतराळवीर विल्मोर आणि सुनीता विल्यम्स 2025 ला परतणार आहेत.
दोन्ही अंतराळवीर दोन महिन्याहून अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये आहेत. बोईंग स्टारलायनरमध्ये बिघाड झाल्याने दोन्ही अंतराळवीरांची परती फेब्रुवारी 2025 पर्यंत रखडली आहे. हे मिशन केवळ आठ दिवसांचे होते, मात्र हिलीयम लीक आणि थ्रस्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांचा परतीचा मार्ग रखडला. आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना एलन मस्क यांची कंपनी SpaceXच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलने परत आणले जाईल. 24 सप्टेंबर 2024 ला Crew-9 या मिशनला लॉन्च केले जाईल.
आधी Crew-9 मिशनसाठी चार अंतराळवीर जाणार होते, मात्र आता फक्त दोन अंतराळवीर जातील. याचे कारण म्हणजे परतताना सुनीता आणि बुच यांना परत आणले जाऊ शकेल. त्यामुळे दोन अंतराळवीरांना थांबवून त्यांना पुढच्या मिशनसाठी पाठवण्यात येईल.