मोदक विशेषतः उकडीचे मोदक हा नैवेद्य बाप्पाला सर्वाधिक प्रिय! अवघ्या पाच-सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त मोदकांचे बुकिंग जोरोत सुरू आहे. आतापर्यंत पुणे रेस्टॉरंट आणि केटरर्सकडे तब्बल दोन लाख उकडीच्या मोदकांचे बुकिंग झाले आहे. काही वर्षांपूर्वी दिवाळीचा फराळ, गणेशोत्सवाचे मोदक, उकडीचे मोदक तयार करण्याचे काम घरोघरी सुरू असायचे. मात्र, आता ही परिस्थिती बदलली आहे.
घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी महिलाही पतीबरोबरच नोकरी व्यवसाय करतात. घड्याळाच्या काट्याप्रमाणेच धावपळ सुरू आहे. दोघेही नोकरदार असल्यामुळे मुबलक पैसा दरमहा घरात येतो. त्यामुळे कामाच्या व्यापात फराळ असो वा मोदक करणे महिलांना इच्छा असूनही जमत नाही. त्यामुळे तयार मोदक घेणे हे त्यांच्यासाठी सोयीचे ठरते. यंदाही उकडीच्या मोदकांस चांगलीच मागणी आहे.
यासंदर्भात पुणे रेस्टॉरंट आणि केटरर्सचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी ते म्हणाले, ‘नारळ, जायफळ, वेलची, तांदूळ, शिवाय मजुरीतही वाढ झाल्याने यावर्षी मोदकांच्या दरात पाच ते दहा रुपये वाढ होऊन 35 ते 40 रुपये एका मोदकाची किंमत झालेली आहे.’ किशोर सरपोतदार यांचा कोथरूड येथे हातवळणी उकडीच्या मोदकांचा कारखाना आहे. येथे यावर्षी पुण्यातून 2 लाख मोदकांची मागणी आहे. शिवाय पुण्याबाहेरही मागणी आहे.
पुण्याबाहेरील ऑर्डरसाठी 6 महिने टिकणारे फ्रोझेन मोदक दिले जातात. येथे वर्षभर उकडीचे मोदक उपलब्ध असतात. या 2-3 वर्षांत मोदक विक्रेते वाढले आहेत. मोठमोठ्या मिठाई दुकानातही हल्ली उकडीच्या मोदकांसह चॉकलेट मोदक, कलाकंद मोदक, केशर काजू मोदक असे विविध प्रकारचे मोदक उपलब्ध असतात. परंतु, खास हातवळणीच्या मोदकांना जास्ती मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
मावा मोदकही महागले
यावर्षी मावा मोदकांमध्येही पाच टक्के वाढ होऊन 1किलो मावा मोदकांची किंमत 700 रुपये झाली आहे. दुधाचे दर वाढल्याने मावा मोदकांत वाढ झाली असून, इंधनाच्या किमतीचाही परिणाम मोदकांच्या किमतीवर होत असल्याचे काका हलवाई येथील कर्मचारी ऋतुजा खांबे यांनी सांगितले.