भरधाव ट्रकची टाटा मॅजिकला पाठीमागून धडक; देवदर्शनाला निघालेल्या 7 भाविकांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी

हरयाणातील जिंदमध्ये भीषण रस्ते अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. हिसार-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील मर्चहेडी गावातील 15 लोक टाटा मॅजिक गाडीने राजस्थानमधील गोगामेडी येथे देवदर्शनासाठी निघाले होते. सोमवारी सायंकारी हे सर्व भाविक मार्गस्थ झाले होते. रात्री सर्व झोपेत असताना नरवानातील बिधराना गावाजवळ लाकडाची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने टाटा मॅजिकला पाठूमागून जोरात धडक दिली.

ट्रकच्या धडकेमुळे टाटा मॅजिक पलटी झाली आणि रस्त्याजवळील खड्ड्यात पडली. महामार्गावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी गाड्या थांबवून जखमींची मदत केली आणि नरवाना पोलीस स्थानकात याची माहिती दिली. पोलिसांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळ गाठत बचावकार्य सुरू केले. मात्र 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता, तर 8 जण गंभीर जखमी झाले. जखमींना अग्रोहा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल केले आहे.